मशिदींवरील भोंग्यावरुन हिंदू परिषदेच्या अध्यक्षानं राज ठाकरेंना डिवचलं; म्हणाले, आता कुठं गेलं.. I Pravin Togadia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pravin Togadia attacks Raj Thackeray

उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सरकारच्या काळात राज ठाकरे हे भोंग्याच्या विरोधात मैदानात उतरले होते.

Pravin Togadia : मशिदींवरील भोंग्यावरुन हिंदू परिषदेच्या अध्यक्षानं राज ठाकरेंना डिवचलं; म्हणाले, आता कुठं गेलं..

Pravin Togadia attacks Raj Thackeray : मशिदीवरील भोंग्यावरून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया (Praveen Togadia) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) डिवचलंय. उद्धव ठाकरेंच्या काळात अजानच्या मुद्द्यावरून राज ठाकरे मैदानात उतरले होते. आता काय झालं? असा सवाल त्यांनी केलाय.

आता ते कधी आंदोलन करणार हे त्यांना विचारा, असा टोलाही तोगडिया यांनी राज ठाकरेंना लगावला. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार असताना राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन पुकारलं होतं. मशिदींवरील बेकायदा भोंगे हटले नाहीत तर आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज यांनी दिला होता.

प्रवीण तोगडिया यांनी नेमक्या याच मुद्द्यावरून राज ठाकरेंना टोला हाणलाय. एका पत्रकार परिषदेत तोगडिया यांना मशिदीवरील भोंगे व अजान प्रश्नी आपली भूमिका काय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तोगडिया यांनी राज ठाकरे यांच्याकडं बोट दाखवलं.

‘हा प्रश्न तुम्ही राज ठाकरेंना विचारायला हवा. आता त्यांच्या मित्रांचं सरकार आलंय. आता आंदोलन करून बेकायदा भोंगे बंद करायला का भाग पाडत नाही? उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सरकारच्या काळात राज ठाकरे हे भोंग्याच्या विरोधात मैदानात उतरले होते. आता एकनाथजी आणि देवेंद्र भाऊंच्या राज्यातही त्यांनी मैदानात यावं, आम्ही त्यांना साथ देऊ,’ अशी ग्वाही तोगडिया यांनी दिलीये. तोगडियांच्या या सवालावर राज ठाकरे आता काय उत्तर देतात याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.