उशिरा का होईना मिळाला सन्मान ! इतिहासाच्या पुस्तकात मानवतावादी डॉ. कोटणीसांविषयी माहिती

Dr. Kotnis
Dr. Kotnis

सोलापूर : देशातील तेलंगणा, आंध्र प्रदेश सरकारने डॉ. कोटणीस यांच्या कार्याची आठवण राहावी म्हणून शालेय अभ्यासक्रमात विशेष पाठ समाविष्ट केला आहे. कर्नाटकात देखील आठवी अभ्यासक्रमात त्यांच्यासंबंधी धडा आहे. उशिरा का होईना यावर्षी महाराष्ट्रात बारावी इतिहास पुस्तकात त्यांच्या विषयीची माहिती देण्यात आली आहे. अभ्यासक प्रा. गणेश चन्ना यांनी डॉ. कोटणीस यांच्या संदर्भात kotnismemorialsolapur.org विशेष संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर त्यांच्या कार्याचा सर्व तपशील उपलब्ध करण्यात आला आहे. सोलापूर महापालिकेनेही एक संकेतस्थळ सुरू केले असून, drkotnissmarak.org या नावाने चालवले जाते. 

डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोलापूर शहरातील डॉ. कोटणीस यांच्या घराचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात करण्यात आले. 1 जानेवारी 2011 रोजी तत्कलीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत संग्रहालयाचे उद्‌घाटन झाले. या संग्रहालयात डॉ. कोटणीस यांच्या वापरातील वस्तू व पुस्तके, पत्रे, छायाचित्रे आदी अनेक वस्तू जतन करण्यात आल्या आहेत. चीन सरकारने त्यासाठी अनेक छायाचित्रे संग्रहालयासाठी दिली. तसेच डॉ. कोटणीस यांचा मिलिटरी वेशातील अर्धपुतळा चीन सरकारने दिला. सध्या या संग्रहालयाच्या देखभालीचे काम सोलापूर महानगरपालिका करते. 

या संग्रहालयासोबत चिनी भाषा प्रशिक्षणासाठी डॉ. कोटणीस एज्युकेशन स्टडी सेंटर स्थापन करण्यात आले आहे. संग्रहालयाच्या इमारतीबाहेरील भागात डॉ. कोटणीस यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. तेथे 2008 पासून चिनी भाषा शिकण्याची सोय केली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील वेंगुर्ला या डॉ. कोटणीस यांच्या मूळगावी देखील त्यांच्या नावाने कार्य केले जाते. पंजाबमध्ये लुधियाना येथे डॉ. कोटणीस यांच्यासंदर्भात डॉ. इंद्रजित बिंद्रा हे काम करतात. तसेच बंगळूरमध्ये इंडो-चायना फ्रेंडशिप संस्था ही डॉ. कोटणीस यांच्या विचारांवर कार्य करते. देशाच्या इतर काही भागांत अनेक रुग्णालयांना त्यांचे नाव दिले आहे. 

चीनमध्ये मानवतावादी कार्याची आजही प्रशंसा
डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म 10 ऑक्‍टोबर 1910 रोजी झाला. प्राथमिक शिक्षण सोलापूर येथे पूर्ण केल्यानंतर मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेऊन ते शल्यचिकित्सा या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होते. तेव्हा याच कालावधीत दुसरे महायुद्ध सुरू झाले. 1938 मध्ये जपान व चीन युद्धामध्ये चीनचे सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले. उपचार करण्याकरिता डॉक्‍टरांची कमतरता असल्याने चीनने भारताकडे डॉक्‍टरांची मदत मागितली. तेव्हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय डॉक्‍टरांना चीनमध्ये जखमींच्या उपचारासाठी जावे, असे आवाहन केले होते. तेव्हा डॉ. द्वारकानाथ कोटणीस या आवाहनाला प्रतिसाद देत चीनमध्ये पोचले. त्यांनी अहोरात्र उपचाराची सेवा देत अनेक जखमी सैनिकांचे प्राण वाचवले. त्यांच्या कार्याबद्दल चीनमध्ये त्यांच्या मानवतावादी कार्याची आजही प्रशंसा केली जाते. चीनमध्ये सर्वाधिक आदराचे स्थान मिळवणारा भारतीय म्हणून ते ओळखले जातात.

डॉ. कोटणीस यांच्या कार्यावर डॉक्‍युमेंटरी 
अभ्यासक रवींद्र मोकाशी यांनी डॉ. कोटणीस यांच्या कार्यावर डॉक्‍युमेंटरी तयार केली आहे. आता ही डॉक्‍युमेंटरी संग्रहालयाला दिली जाणार आहे. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे बंधू मंगेश शांताराम कोटणीस यांनी डॉ. कोटणीस यांचे एक चरित्र ग्रंथ 1984 मध्ये लिहिले होते. एमएसएमआरए वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेसाठी एक छोटेखानी चरित्र रवींद्र मोकाशी यांनी लिहिले आहे. 

सध्या कोरोना संकट व भारत-चीन संबंधातील ताणतणावाचा घटनाक्रम सुरू आहे. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या कार्याचा आजही चीनममध्ये आदरपूर्वक उल्लेख होतो. तसेच चीनच्या वरिष्ठ नेत्यांनी भारत दौऱ्यात मुंबई येथील डॉ. कोटणीस यांच्या भगिनी मनोरमा कोटणीस यांची भेट घेतलेली होती. चीनचे सर्वेसर्वा माओ-त्से-सुंग यांनी डॉ. कोटणीसांच्या मृत्यूबद्दलच्या शोकसंदेशांचे पत्र पाठवले होते. या पत्रामध्ये चिनी सैन्याने आपला जवळचा आणि देशाचा मित्र गमावला आहे, असा शोकसंदेश दिला होता. हे दुर्मिळ पत्र संग्रहालयात जतन करण्यात आले आहे. 

लेखक तथा डॉ. कोटणीस कार्य अभ्यासक रवींद्र मोकाशी म्हणतात, डॉ. कोटणीस यांच्या संदर्भात अनेक प्रकारची कार्ये केली जात आहेत. डॉ. पी. के. वसू यांनी लिहिलेल्या "कॉल ऑन एनआर' व डॉ. कोटणीस यांच्या पत्नी गीयानकुलान यांचे "माय लाईफ विथ डॉ. कोटणीस' ही पुस्तक महत्त्वाची ठरतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमात डॉ. कोटणीस यांच्याबाबत काही भाग समाविष्ट करावेत, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. 

डॉ. कोटणीस स्टडी एज्युकेशन सेंटरचे रमेश मोहिते म्हणाले, सोलापूरमध्ये डॉ. कोटणीस एज्युकेशन अँड स्टडी सेंटर चालवण्यात येते. या ठिकाणी 2008 पासून चिनी भाषेचे शिक्षण दिले जात आहे. त्याला विद्यार्थी व अभ्यासकांचा चांगला प्रतिसाद असतो. 

अभ्यासक प्रा. गणेश चन्ना म्हणाले, नव्या पिढीला डॉ. द्वारकानाथ कोटणीसांचे कार्य माहीत असावे यासाठी भारत व चीन या दोन्ही देशांमध्ये आजही कायम प्रयत्न असतात. त्यांची प्रेरणा मुलांमध्ये रुजवण्याचे कार्य केले जाते. डॉ. कोटणीस यांचे कार्य आजही भारत व चीन संबंधामधील मानवतावादी दुवा म्हणून महत्त्वाचे ठरत आहे. भारत-चीन संबंधाबद्दल अनेक घडामोडी होत असताना डॉ. कोटणीस यांचे नाव या संबंधांची सकारात्मकता वाढवणारे आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com