प्रशासन सुधारेना, कोरोना आवरेना ! बाधितांमध्ये "ग्रामीण' गेले सोलापूर शहराच्या पुढे 

प्रमोद बोडके 
Monday, 10 August 2020

महापालिका हद्दीतील कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटल्याने बाधितांच्या आकडेवारीत अनलॉकनंतर घट झाली आहे. ग्रामीण भागात टेस्टिंग वाढल्या म्हणून बाधितांची संख्या वाढत आहे. महापालिका हद्दीत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहिमच बंद असल्याने फक्त 319 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत. सोलापुरातील कोरोनाला महापालिका प्रशासन झाकून नेत असल्याचा संशय त्यातून बळावत आहे. बार्शी, पंढरपूर, करमाळा, अक्कलकोट, कुर्डुवाडी या मोठ्या नगरपरिषदा कोरोनाच्या विळख्यात अडकल्या आहेत. 

सोलापूर : सांगोल्यातील घेरडीत 24 एप्रिलला पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला. ग्रामीणची सुरवात सांगोल्यातून झाली; परंतु आजच्या घडीला बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. सोलापूर शहरातील बाधितांच्या संख्येला (5422) आज ग्रामीण भागातील बाधितांच्या संख्येने (5557) मागे टाकले आहे. मृत्यूचा टक्का आणि बाधितांची संख्या घटल्याचा दावा जिल्हा प्रशासन कितीही करत असले तरीही कोरोनाची पाळेमुळे अधिक घट्ट रुजू लागल्याचे सिद्ध होत आहे. कोरोना रोखण्यात प्रशासन सुधरेना अन्‌ कोरोना आवरेना अशीच अवस्था जिल्ह्याची झाली आहे. 

हेही वाचा : ब्रेकिंग! सोलापुरातील देगावच्या ओढ्यातील मगरींना पकडण्यासाठी ठरला "हा' प्लॅन 

महापालिका हद्दीतील कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटल्याने बाधितांच्या आकडेवारीत अनलॉकनंतर घट झाली आहे. ग्रामीण भागात टेस्टिंग वाढल्या म्हणून बाधितांची संख्या वाढत आहे. महापालिका हद्दीत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहिमच बंद असल्याने फक्त 319 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत. सोलापुरातील कोरोनाला महापालिका प्रशासन झाकून नेत असल्याचा संशय त्यातून बळावत आहे. बार्शी, पंढरपूर, करमाळा, अक्कलकोट, कुर्डुवाडी या मोठ्या नगरपरिषदा कोरोनाच्या विळख्यात अडकल्या आहेत. कोरोनाची विभागणी ग्रामीण (जिल्हा परिषद) आणि शहरी (महापालिका) अशीच होत असल्याने जिल्ह्याचा नागरी भाग प्रशासनाच्या तावडीतून सुटू लागला आहे. कोरोनाच्या लढाईत जशी स्थिती महापालिकेतील यंत्रणेची आहे, तशीच स्थिती आणि मानसिकता जिल्ह्यातील नगरपरिषदांची आहे. 

हेही वाचा : क्राईम ! आजीच्या देखभालीसाठी असलेल्या तरुणाचे नर्ससोबत जुळले अन्‌ पुढे... 

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ म्हणाले, महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदा या जरी प्रशासकीयदृष्ट्या स्वतंत्र असल्या तरीही आपल्याला सोलापूर जिल्हा एकत्रित मानूनच काम करावे लागेल. सर्वसामान्य लोक व्यवहार व इतर कारणानिमित्त या तिन्ही हद्दीतून जातात, त्यामुळे कोरोनामुक्तीसाठी या तिन्ही संस्थांनी एकत्रितरीत्या प्रभावी प्रयत्न केल्यासच जिल्हा कोरोनामुक्त होईल. जिल्ह्यातील एक हजार 27 ग्रामपंचायतींपैकी फक्त 381 ग्रामपंचायतींच्या हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव उद्‌भवला आहे. 

नागरिक अलका कोळेकर म्हणाल्या, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार व सुविधा मिळतात. आम्ही ते स्वत: अनुभवल्याने या हॉस्पिटलबद्दल असलेले आमचे गैरसमज दूर झाले. कोरोनावर प्रभावी काम करण्यात महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आला. ज्या ठिकाणी कोरोनाबाधित आढळतात त्या ठिकाणी महापालिकेची यंत्रणा निर्जंतुकीकरण करत नाही, बाधिताच्या घरातील व्यक्तींची तपासणी, व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा पुरवठा होत नसल्याचा वाईट अनुभव आम्हाला आला आहे. महापालिकेच्या यंत्रणेवर व प्रशासनाच्या मानसिकतेच्या आधारावर सोलापूर कमी कालावधीत कोरोनामुक्त होईल याबद्दल साशंकताच वाटते. 

जिल्ह्यातील कोरोनाची विभागणी 
नागरी भाग (नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका कार्यक्षेत्र) 

 • लोकसंख्या : 4 लाख 
 • बाधित : 2014 
 • मृत्यू : 63 
 • कोरोनामुक्त : 1146 
 • (स्थिती : 8 ऑगस्ट, रात्री 12 पर्यंतची) 

शहरी भाग (महापालिका कार्यक्षेत्र) 

 • लोकसंख्या : 10 लाख 
 • बाधित : 5422 
 • मृत्यू : 380 
 • कोरोनामुक्त : 3935 
 • (स्थिती : 8 ऑगस्ट, रात्री 12 पर्यंतची) 

ग्रामीण भाग (ग्रामपंचायत कार्यक्षेत्र) 

 • लोकसंख्या : 30 लाख 
 • बाधित : 3543 
 • मृत्यू : 99 
 • कोरोनामुक्त : 2014 
 • (स्थिती : 8 ऑगस्ट, रात्री 12 पर्यंतची) 

आकडे बोलतात... 
ग्रामीणमध्ये असा वाढला कोरोना 

 • महिना     बाधितांची संख्या     मृतांची संख्या 
 • एप्रिल :             02                       01 
 • मे      :             38                       04 
 • जून    :           321                      13 
 • जुलै    :          3292                     85 
 • 7 ऑगस्टपर्यंत 1222                    41 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rural corona patient population went beyond the city of Solapur