पाच वर्षापूर्वी देशातले ‘हे’ फुलपाखरांचे गाव म्हणून घोषीत केले; पण आता काय झाले तिथे वाचा

सुस्मिता वडतिले
Monday, 22 June 2020

सरकारने मोठा गाजावाजा करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोलीला (ता. सावंतवाडी) राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून जाहीर केले. पण ही घोषणा होऊन पाच वर्ष झाले तरी, अद्याप येथे काहीच झालेले नाही. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत जून २०१५ मध्ये ‘ब्ल्यू मॉरमॉन’ या फुलपाखरला सन्मान देण्यात आला.

सरकारने मोठा गाजावाजा करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोलीला (ता. सावंतवाडी) राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून जाहीर केले. पण ही घोषणा होऊन पाच वर्ष झाले तरी, अद्याप येथे काहीच झालेले नाही. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत जून २०१५ मध्ये ‘ब्ल्यू मॉरमॉन’ या फुलपाखरला सन्मान देण्यात आला. त्यानंतर फुलपाखरांचे गाव म्हणून घोषणा करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरल्याचा दावा केला जाऊ लागला. मात्र ही निर्णय घोषणा कागदावरच राहिला आहे.
आंबोलीमधील बटरफ्लाय फेस्टिव्हलमध्ये फुलपाखरांचे गाव म्हणून २२ जून २०१५ ला पारपोलीची निवड झाली.‌ फुलपाखरांचे सर्वाधिक विविधता पारपोलीमध्ये आहे. या गावात महाराष्ट्रातील फुलपाखरांच्या २२० पैकी २०४ प्रजाती आढळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना रंगबिरंगी फुलपाखरू पाहायला आवडतात. दरवर्षी पावसाळ्यात फुलझाडांच्या बागेत विविध रंगांची व अनेक नक्षीने युक्त असलेल्या पंखांची फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर स्वच्छंदपणे उडताना पाहावयास मिळतात. फुलपाखरांच्या रंगीत व मनोहर पंखांमुळे हे कीटक उडताना लहानथोरांचे लक्ष सहजतेने आकर्षून घेतात. आपल्या पर्यावरणाचे महत्वपूर्ण घटक असलेल्यांमध्ये फुलपाखरु अनेकांना आवडतात. फुलपाखरांमुळे कुठल्याही ठिकाणच्या पर्यावरणाचे सौंदर्यमूल्य वाढते. त्यातच फुलपाखरांच्या गावाचा सन्मान मिळालेले पारपोली हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. देशातील सर्वांत मोठे 'सदर्न बर्ड विंग' हे फुलपाखरू देखील पारपोलीत सापडले.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अंबोली येथील फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले म्हणाले, राज्य सरकारने पारपोलीला फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित करुन पाच वर्ष झाले आहेत. परंतु येथे अद्यापही नव्याने काहीच सुधारणा झाली नाही. सरकारने नुसते गावाचे नाव घोषित करून दिले आहे, पण येथे कोणत्याही प्रकारची नव्याने सुधारणा झालेली नाही. या गावात व्यवस्थित लक्ष देऊन काही बदल केले तर मोठ्या प्रमाणात पर्यटन परिसर तयार होईल, त्यामुळे गावातील लोकांना रोजगार मिळेल. 
सावंतवाडीतील प्रा. डॉ. गणेश मर्गज म्हणाले, राज्य सरकारने २०१५ मध्ये फुलपाखरांचे गाव म्हणून पारपोलीची घोषणा केली. या गावात फुलपाखरांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलं आहे. परंतु याठिकाणी पर्यटकांकरिता सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. सुविधा दिल्यास पर्यटकांची गर्दी वाढेल व आर्थिक उलाढाल वाढेल.

ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखराला महाराष्ट्राच्या प्राणीकोषात ‘राणी पाकोळी’ असे मराठी नाव दिले आहे. हे फुलपाखरू महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील जंगलांत आढळते. राज्य फुलपाखरू 'ब्ल्यू मॉरमॉन आणि सर्वात मोठे फुलपाखरू 'सदर्न बर्डविंग' आंबोलीत मोठ्या संख्येने आढळतात. पुराणातील कथांपासून अलीकडच्या साहित्यापर्यंत फुलपाखरांच्या सौंदर्यावर विपूल लिखाण झाले आहे. फुलांच्या ताटव्यांवर मुक्तपणे बागडणाऱ्या या रंगबेरंगी फुलपाखरांमुळे नवोदित कवींच्या प्रतिभेला स्फूरण मिळत आले आहे. अलिकडील हौशी छायाचित्रकारांसाठी फुलपाखरे म्हणजे क्रिएटिव्हिटीला वाव देणारे कलरफूल ऑब्जेक्ट ठरत आहेत. थोरामोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना सौंदर्याने आपलेसे करून टाकणारा हा कीटक जैववैविध्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठेवा बनत चालला आहे. 
महाराष्ट्रात २५१ फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. महाराष्ट्र फुलपाखरांच्या वैविध्याच्या बाबतीत खूप समृद्ध आहे. ज्या ठिकाणी जितके जास्त जैववैविध्य, तितकी तिथे फुलपाखरांची विविधता अधिक दिसते. फुलपाखरे ही तापमान बदलांचेही प्रतिक असतात. फुलपाखरांचे प्रकार वेगवेगळे पाहायला मिळतात. या अनोख्या कीटकाचे आयुष्य अवघ्या दोन ते तीन महिन्याचे असते. मात्र, हा कालावधी फक्त आणि फक्त निसर्गसेवेसाठी वापरायचा, हे ध्येय घेऊनच ती जगत असतात.

फुलपाखरू अभ्यासक रत्नाकर हिरेमठ म्हणाले, भारतात फुलपाखरांच्या वैविध्याने महाराष्ट्र समृद्ध बनले आहे. मुख्यतः वनविभागाने फुलपाखरांचे वास्तव्य असलेल्या वनस्पतींची योग्यपध्दतीने काळजी घेतली पाहिजे. तसेच अनेक ठिकाणी बटरफ्लाय गार्डन तयार करायला हवे. जेणेकरून महाराष्ट्रात आणखीन फुलपाखरांच्या संख्येत वाढ होईल. आपणही फुलपाखरांना आकर्षिक करणारी वनस्पती झाडे लावून त्यांची संख्या वाढवू शकतो.

अशी झाली निवड
मलबार नेचर कॉन्सर्वेशन क्लब, वनविभाग यांच्या वतीने तीन दिवसांच्या फुलपाखरू महोत्सवादरम्यान पारपोलीला राज्यातील फुलपाखरांच्या २२० पैकी २०४ प्रजाती आढळले. महाराष्ट्रात फुलपाखरांचे सर्वाधिक विविधता या गावामध्ये आहे. महाराष्ट्रात फुलपाखरांचे सर्वाधिक विविधता पारपोलीमध्ये आहे. त्यामुळे पारपोलीची निवड झाली.

असे दिले फुलपाखरुला मराठी नाव 
'ब्ल्यू मॉरमॉन' या फुलपाखरुला महाराष्ट्राच्या प्राणीकोषात ‘राणी पाकोळी’ असे मराठी नाव दिलेले आहे. हे फुलपाखरू महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील जंगलांमध्ये आढळते.

असा दिसतो 'ब्ल्यू मॉरमॉन'
'ब्ल्यू मॉरमॉन' या फुलपाखराचा आकार १५ सेंटीमीटरपर्यंत असून त्याचे पंख काळे आहेत. या फुलपाखराचे पुढील व मागील पंखांवर निळ्या रंगावर स्पष्ट काळ्या खुणा असतात. हा फुलपाखरू वेगात उडताना त्याच्या काळ्या पंखांवरील निळी झळाळी सहज नजरेस पडते. खालील बाजूस पंखांच्या शरीराकडील टोकावर चटकदार लाल ठिपका असतो.

फुलपाखरांचा आहार
फुलपाखरु म्हटले की, त्यांचा आणि फुलांचा संबंध आपल्या नजरेसमोर तरळतो. फुलांमधील मधुरस हाच अनेक प्रजातीच्या फुलपाखरांचा आहार असतो. हा मधुरस चाखण्यासाठी जेव्हा फुलपाखरे फुलांना भेट देतात. तेव्हा त्या वनस्पती फुलपाखरांकडून एक काम करवून घेतात. फुलांचे परागकण फुलपाखरांच्या शून्डेला, पायांना चिकटून दुसऱ्या फुलापर्यंत पोहोचतात. अशा प्रकारे फुलांचे परागीभवन घडून येते.

अशी होते फुलपाखरांची वाढ
काही ठराविक झाडांवर फुलपाखरू अंडी घालतात. अंड्यांचा कालावधी सात ते आठ दिवसांचा असतो. त्यावेळी त्या अंडीतून काही आळ्या बाहेर पडतात. त्या आळ्या त्याच झाडावर वास्तव करतात आणि त्यानंतर स्वत: भोवती एक कोश तयार करतात. पुढील सात ते आठ दिवसांनंतर त्या कोशामधून फुलपाखरू बाहेर पडल्यानंतर ते फुलपाखरू पूर्णतः परिपक्व बनतात. म्हणजेच त्या छोट्या आळीपासून नव्या फुलपाखरांची वाढ होते. एकूणच नवीन फुलपाखरू तयार होण्याचं असा वर्तुळ असतो. (पुलपाखराचे गाव म्हणून घोषीत झालेल्याच्या कही ठिकाणी वेगवेगळी नोंद असल्याचे सामोर येत आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How did the first butterfly village in Maharashtra come to be