सोलापुरात कसे येते एमडी ड्रग्ज? मुंबई-पुण्यातील एजंट व्हॉट्‌सॲप कॉलवरून साधतात संपर्क; व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना एजंटांमार्फत मिळते ‘एमडी’, वाचा...

पुणे-मुंबईत ड्रग्जच्या व्यसनात बुडालेले अनेकजण पुन्हा मूळ गावी आले आहेत, पण ना त्यांचे व्यसन सुटले ना ड्रग्ज पुरवणाऱ्या एजंटांनी त्यांचा संपर्क तोडला. दुसरीकडे नव्याने ड्रग्जच्या विळख्यात अडकलेले तरुण-तरुणी तलफ भागविण्यासाठी स्वत:च एजंट शोधतात. पुणे-मुंबईत प्रतिग्रॅम दीड-दोन हजार रुपयास मिळणारे एमडी ड्रग्ज सोलापुरात मात्र तीन हजार रुपये ग्रॅम दराने विकले जाते.
drug
drugesakal
Updated on

सोलापूर : पुणे-मुंबईत ड्रग्जच्या व्यसनात बुडालेले अनेकजण पुन्हा मूळ गावी आले आहेत, पण ना त्यांचे व्यसन सुटले ना ड्रग्ज पुरवणाऱ्या एजंटांनी त्यांचा संपर्क तोडला. दुसरीकडे नव्याने ड्रग्जच्या विळख्यात अडकलेले तरुण-तरुणी तलफ भागविण्यासाठी स्वत:च एजंट शोधतात. पुणे-मुंबईत प्रतिग्रॅम दीड-दोन हजार रुपयास मिळणारे एमडी ड्रग्ज सोलापुरात मात्र तीन हजार रुपये ग्रॅम दराने विकले जाते. विश्वासू एजंटांच्या मागणीवरून पुणे-मुंबईतील छोटे-मोठे डिलर ‘एमडी’ सोलापुरात आणून देतात, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

मुंबईतील ‘डीलर’ पुणे, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमधील खात्रीलायक एजंटाच्या माध्यमातून व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना ‘एमडी’ पोच करतात. सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, मुस्ती, संगदरी, तांदुळवाडी, दर्गनहळ्ळी भागातील काही तरुण ‘एमडी’च्या आहारी गेले. त्यांना तुळजापूरमधील एजंट देखील ड्रग्ज पुरवत होते. एमडी ड्रग्ज हे नशेसाठी वापरले जाते. पानात, तंबाखूत टाकून खातात किंवा पाण्यात टाकून पितात. शरीरासाठी अपायकारक असलेले ड्रग्ज एक-दोनवेळा घेतले की पुन्हा सहजपणे हे व्यसन सुटत नाही.

आपण पोलिसांना सापडणार नाही याची पुरेपूर दक्षता एजंट व पुरवठादार घेतो. सोलापूर ग्रामीण व शहर पोलिसांची पथके यापूर्वीच्या कारवायात अनेकदा मुंबईला जाऊन आले, पण त्यांच्या हाती ठोस असे काहीही लागले नाही. ते सगळेजण आपले पत्ते, मोबाईल सतत बदलतात. पोलिसांना सापडू नये म्हणून व्हॉट्‌सॲप कॉलवरून एकमेकांशी संपर्क साधतात, अशा बाबी समोर आल्या आहेत. आता सोलापूर शहर पोलिस एमडी ड्रग्ज पुरविणारे व व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना ड्रग्ज पुरविणारे नेमके कोण, याचा सखोल तपास करीत आहेत.

आतापर्यंतच्या ठळक कारवाया...

  • (१) ऑक्टोबर २०२३ : मोहोळ तालुक्यातील देवडी पाटी येथे तीन किलो एमडी ड्रग्ज विकताना ग्रामीण पोलिसांनी औंढी (ता. मोहोळ) गावातील दोघांना पकडले होते. तत्पूर्वी, याच महिन्यात एमडी ड्रग्ज विकायला गेलेल्या बाळे परिसरातील गवळी बंधूंना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. चिंचोळी एमआयडीसीतील बंद पडलेल्या कारखान्यात ते ड्रग्ज बनवत होते.

  • (२) नोव्हेंबर २०२३ : नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज सापडल्यानंतर सोलापुरातील चंद्रमौळी एमआयडीसीतील एका बंद उद्योगाच्या खोलीतून सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सुमारे दोन हजार लिटर रसायन व कच्चा माल जप्त केला होता. मुंबईचे पोलिस तपासासाठी सोलापुरात आले होते.

  • ३) ७ ऑगस्ट २०२५ : पुण्यातून एमडी ड्रग्ज घेऊन सोलापुरात येणाऱ्या पाच जणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून चिंचोळी एमआयडीसीजवळ महामार्गावर पकडले होते. त्यांच्याकडे १८ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले होते. पोलिसांनी सखोल तपास केल्यावर यात शहरातील काही एजंटांना अटक झाली होती.

  • (४) २९ सप्टेंबर २०२५ : सोलापूर शहरातील कर्णिक नगरातील एका तरुणाजवळ पोलिसांना २९ ग्रॅम एमडी ड्रग्ज मिळाले होते. जेलरोड पोलिसांनी त्याला अटक केली होती. कोणालातरी द्यायला त्याने ते एजंटाकडून घेतल्याचे तपासात समोर आले होते.

  • ५) २२ एप्रिल २०२६ : सोलापुरातील एजंटाच्या संपर्कातून पुण्यातील दोघेजण ४६ ग्रॅम एमडी ड्रग्ज घेऊन सोलापूर शहरात आले होते. जेलरोड पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत असून याचे धागेदोरे मुंबईपर्यंत असून पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com