शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना होणार लाभ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

कर्जमाफीविषयी महत्त्वाचे

  • १५ फेब्रुवारीला पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध होणार
  • ई-सेवा केंद्रे, स्वस्त धान्य दुकानांमध्ये होणार आधार प्रमाणीकरण 
  • मे महिन्याअखेर पात्र प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार
  • कुटुंबातील एकापेक्षा अधिक थकबाकीदारांचाही योजनेत समावेश केला आहे
  • दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकीदारांसाठी लवकरच योजना 
  • नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना

मुंबई - उद्धव ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल ३४ लाख शेतकऱ्यांना सुमारे २९ हजार ७१२ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी १५ फेब्रुवारीला जाहीर होणार असून, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा होणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विशेष म्हणजे, फडणवीस सरकारने कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी तब्बल तीन वर्षे घेतली होती. मात्र, ठाकरे सरकार येत्या मे महिन्याअखेर पात्र प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याच्या प्रयत्नात आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर गेल्या एक ते दीड महिन्यांपासून सहकार विभागाच्यावतीने थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत चुकीच्या व्यक्तींना कर्जमाफीचा लाभ होऊ नये यासाठी जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांकडील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जखाती आधार कार्डशी संलग्न करून खात्री करण्यात येत आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या विधानाने भाजपच्या आशा पल्लवित, कारण... 

फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांकडून २८ रकान्यांचा अर्ज भरून घेण्यात आला होता. या वेळी मात्र तसे न करता योजनेची अंमलबजावणी सुटसुटीत कशी राहील, याकडे राज्य सरकारचा विशेष कटाक्ष आहे. जिल्हा बँकांकडील थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची छाननी शासनाच्या सहकार विभागामार्फत शासकीय ऑडिटर्सकडून करण्यात येत आहे. तर व्यापारी बँकांकडील कर्जखात्यांची तपासणी कोअर बँकिंग यंत्रणेद्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतरही योजनेअंतर्गत एखाद्या अपात्र व्यक्तीला कर्जमाफीचे लाभ दिले गेल्याचे आढळून आल्यास त्याला संबंधित बँकेला जबाबदार धरले जाणार आहे. 

पहिल्या टप्प्यात जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांकडील ३४ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात येत आहे. संबंधित शेतकऱ्यांना २९,७१२ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. येत्या १५ फेब्रुवारीला पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावपातळीवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How many farmers will get benefits in the first step under the Farmers Debt Relief Scheme