esakal | पाल्याचे बॅंक खाते उघडायचे कसे? पालकांसमोर आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Bank Account

पाल्याचे बॅंक खाते उघडायचे कसे? पालकांसमोर आव्हान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - दोपारच्या येळी साळेत पोरोला आता जेऊणाच्या बदल्यात पैसं (Money) देणार असल्याचं गुरजींनी (Headmaster) आम्हासनी सांगितलंय. पण हे पैसं हातामधी देणार नसल्याचं गुरजी सांगतात. तशासाठी पोराचं बॅंकित खातं (Bank Account) काढा म्हणतायत गुरजी. पोराचं हे पैसं त्याच्या खात्यामधी टाकणारेयत. त्यांना तसा वरुनच आदिस आलंय म्हणत्यात.असलं खातं काढाय बॅंकित गेलतू तर, कसलं की आधार, पान कारड आणा म्हणत्यात. आमच्याकड असलं कसलं कारड नाय. कारड नाय तर खातं नाय, असं बॅंकितून सांगतलय. असलं कारड नाय. मग पोराचं खातं कश्‍यानी काढणार, असं पुरंदर तालुक्यातील येथील धालेवाडी येथील निरक्षर पालक सर्वेशकुमार राठोड सांगत होते. (How to Open a Child Bank Account Challenge to Parents)

राज्य सरकारने उन्हाळ्याच्या सुट्टीतील ३४ दिवसांच्या शालेय पोषण आहारासाठीची रोख रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इयत्ता पहिली पाचवी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५२ रुपये तर, सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी २२८ रुपये वितरित केले जाणार आहेत. या रकमेनुसार पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिवसाला ४ रुपये ४७ पैसे तर, सहावी ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिवसाला ६ रुपये ७० पैसे इतके तोकडे अनुदान मिळणार आहे. मात्र विद्यार्थ्यांना हे पैसे हातात दिले जाणार नाहीत. त्यासाठी त्यांना कोणत्याही एका बॅंकेत खाते उघडणे बंधनकारक आहे. कारण शालेय पोषण आहाराचे अनुदान हे विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यात जमा केले जाणार आहे.

हेही वाचा: एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स; उद्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बॅंकेने खाते उघडण्यासाठी आता आधार कार्ड आणि पॅन कार्डची सक्ती केली आहे. ग्रामीण भागातील शेतमजूर, कामगार आणि आदिवासी भागातील अनेक कुटुंबांकडे अद्यापही आधार कार्ड नाही. पॅन कार्ड हा तर खूप लांबचा भाग. मग अशा पालकांनी त्यांच्या पाल्याचे बॅक खाते कसे उघडावे, असा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

‘बोनाफाईड’ला बॅंकांकडून केराची टोपली

शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे बॅक खाते उघडण्यासाठी पूर्वी शाळेचे किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात असे. आता रिझर्व्ह बॅंकेच्या नव्या नियमामुळे बोऩाफाईड प्रमाणपत्र किंवा शिधापत्रिकेच्या आधारे बॅक खाते उघडता येत नाही. आधार आणि पॅन कार्ड सक्तीचे केले आहे. यामुळे बोनाफाइड प्रमाणपत्राला बॅंकांकडून अक्षरशः केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचा आरोपही जिल्ह्यातील शिक्षकांनी केला आहे.

loading image