
HSC Exam: हस्ताक्षर बदल प्रकरणात मोठी अपडेट! बोर्डानंतर पोलिसही करणार विद्यार्थ्यांची चौकशी
छत्रपती संभाजीनगर: बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या ३७२ उत्तरपत्रिकांचे दोन अक्षर प्रकरण आता पोलिसांकडे वर्ग झाले आहे. बोर्डाच्या वतीने पोलिसांमध्ये दोन अध्यापकांविरुद्ध फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही अध्यापक फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत असून आता या प्रकरणाचा कसा छडा लागणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बारावीच्या परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयाच्या अंबाजोगाई (जि. बीड), कळमनुरी (ता.हिंगोली) येथील उत्तरपत्रिका सोयगाव तालुक्यातील राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यापक राहुल उसारे व अध्यापिका मनीषा शिंदे यांच्याकडे तपासण्यासाठी देण्यात आल्या होत्या.
१३ मार्चपर्यंत या उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठविण्याचे आदेश असताना संबंधित शिक्षकांनी २५ दिवस स्वतःकडे ठेवून आठ एप्रिल रोजी बोर्डाकडे परत पाठवल्या होत्या. या उत्तरपत्रिका तपासल्यानंतर यामध्ये अक्षर बदल असल्याची तक्रार देखील बोर्डाकडे केली नव्हती. त्यानंतर उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करत असताना ही बाब मॉडरेटरच्या लक्षात आली. त्यामुळे बोर्डामार्फत यासंदर्भात एक तपासणी समिती गठित करण्यात आली.
हस्ताक्षर बदल प्रकरणात सुरुवातीला अंबाजोगाई (जि.बीड) आणि कळमनुरी (ता. हिंगोली) येथील एकूण ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका वेगळ्या काढून चौकशी करण्यात आली. त्यात कोणत्याही विद्यार्थ्यांनी ते हस्ताक्षर ओळखीचे असल्याचे म्हटले नाही. त्यानंतर नियामक, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, कस्टोडियन, परीक्षक, मॉडरेटर, मुख्याध्यापक आदींची चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात आली होती.
चौकशीअंती उत्तरपत्रिका छेडछाड प्रकरणात बोर्डाने फर्दापूर (ता. सोयगाव) पोलिस ठाण्यात राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यापक राहुल उसारे व अध्यापिका मनीषा शिंदे या दोन अध्यापकांसह एका अज्ञांतावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
मात्र, गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच संबंधित दोन्ही प्राध्यापक फरार झाले. फरार दोन्ही प्राध्यापकांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. मात्र, या प्रकरणात अजून काही धागेदोरे मिळतात का? यासाठी आता ३७२ विद्यार्थ्यांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.