Asha Bhosle
sakal
आदरणीय आशाताईंशी संवाद म्हणजे नव्या उमेदीच्या जीवनाशी संवाद! माझे भाग्य हे की ‘जिवलगा’ या चित्रपटात त्यांनी माझी सहा गाणी गायिली. त्याही आधी काही चित्रपटांसाठी योग आला. प्रत्येक गाणे गाताना तो प्रसंग अन् व्यक्तिरेखेचा आत्मा जगण्याची त्यांची ऊर्जा ‘याची डोळा’ अनुभवताना मला कला साधनेचे मर्म उलगडत गेले. वर्तमानात जगणे म्हणजे काय, ते मी त्यांच्या रूपात अनुभवले. त्यांची जाहीर मुलाखत घेण्याची संधी मला ‘चतुरंग’च्या व्यासपीठावर मिळाली. समोर पहिल्या रांगेत कोण कोण होते, तर साक्षात स्वरतीर्थ बाबूजी, चित्रमाऊली सुलोचनाबाई, जयश्री गडकर..अशा कलाक्षेत्रातील रूपेरी दंतकथा उपस्थित होत्या. व्यासपीठावर आशाताई अन् भावगीतातील शुक्रतारा अरुण दाते होते. ही विलक्षण रंगलेली मुलाखत पुढे इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात (सप्तसुरांचे जीवनगाणे) महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी दहा वर्षे अनुभवली.