
Sharad Pawar : ...तर मेघालयात आज राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता; 'या' तिघांनी केली होती NCPची स्थापना
Meghalaya Assembly Election : मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी अर्थात एनपीपीने सत्तेवर दावा केला आहे. एनपीपीचा शपथविधीदेखील होईल. मुख्यमंत्री कॉनराड संगमा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, हे स्पष्ट आहे. परंतु २०१२ मध्ये एक घडामोड घडली. ती घडली नसती तर आज मेघालयमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुख्यमंत्री राहिला असता.
१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हा एकट्या शरद पवारांनी पक्ष स्थापन केलेला नव्हता. त्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडलेले पूर्णो अगितोक संगमा, तारीख अन्वर आणि शरद पवार या तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. शरद पवारांनी स्वतःकडे अध्यक्षपद ठेवलं होतं. परंतु पुढे दोघेजण पक्षातून बाहेर पडले आणि एकट्या शरद पवारांनी पक्ष पुढे नेला.
तारीख अन्वर आणि पूर्णो संगमा राष्ट्रवादीतून बाहेर का पडले?
२०१२मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पी.ए. संगमा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. एनडीएकडून संगमांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिलं. राष्ट्रपती पदासाठी संगमा यांची उमेदवारी एआयएडीएमके आणि बीजेडीने प्रस्तावित केली होती आणि नंतर भाजपनेही पाठिंबा दिला होता. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला शरद पवारांच्या विरोधानंतर संगमा यांनी २० जून २०१२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.
२९ सप्टेंबर २०१८ रोजी तारीख अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षात किंमत मिळत नसल्याची त्यांनी नाराजी होतीच. परंतु राफेल करारावर पंतप्रधान मोदींना 'क्लीन चिट' दिल्याच्या शरद पवार यांच्या विधानानंतर त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर जाणं पसंत केलं.
कॉनराड संगमा राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री असते
मेघालयचे विद्यमान मुख्यमंत्री कॉनराड संगमा हे पी. ए. संगमा यांचे सुपुत्र आहेत. पी. ए. संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला नसता तर कॉनराड संगमा यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असती. पी. ए. संगमा यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना केली. २०२१ मध्ये त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.
मागच्या वेळी २०१८ मध्येच पीए संगमा यांचे सुपुत्र कॉनराड संगमा हे मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर आरुढ झाले. यावेळी पुन्हा त्यांच्या पक्षाला बहुमत मिळालं आहे. एनपीपीचे मेघालयात २६ आमदार निवडून आले आहेत. बहुमतासाठी ३१ आमदारांचं संख्याबळ गरजेचं असतं. संगमा यांना भाजपसह इतरांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्या बहुमताचा मेळ जमलेला आहे. शपथविधी सोहळ्यासाठी 7 मार्च ही तारीखही निश्चित करण्यात आलीय.