file photo
file photo

भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं, तर मग हे करा...

नांदेड : देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे. आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षण दलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किंवा देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नईसारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते.

भारतीय संरक्षण दले देखील वेळोवेळी आपल्या देशातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्याची संधी देत असतात. आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त संस्था "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी" म्हणजेच "National Defence Academy (NDA) / एन.डी.ए." च्या पात्रता, निवड प्रक्रिया व निवड झाल्यानंतरचे प्रशिक्षण या बद्दल माहिती पाहणार आहोत. भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलात अधिकारी होण्याची पूर्व तयारी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या एन. डी. ए. खडकवासला, पूणे येथे करवून घेतली जाते. 

शैक्षणिक पात्रता:

एन. डी. ए. मध्ये दाखल होतांना उमेदवार १२ वी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी १२ वीत शिकत असावा अथवा १२ वी उत्तीर्ण असावा. एन.डी.ए. च्या आर्मी शाखेसाठी उमेदवार १२ वी च्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा. आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवारने १२ वी ला गणित व भौतिकशास्त्र (Maths आणि Physics) हे विषय घेतलेले असावे. 

वयोमर्यादा:

एन. डी. ए. मध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय- साडेसोळा ते साडेएकोणवीस (Sixteen and Half to Nineteen and Half) दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया:

एन. डी. एमध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय.

प्रवेश परीक्षा:

एन. डी. एची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर हे दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इ. ११वी व १२ वीचा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपर मध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय सामाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणता तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मार्फत मुलाखती साठी बोलावले जाते. 

सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत:

भारतीय सैन्यदलांत अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या सर्व तरुणांना ही मुलाखत उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुलाखत पाच दिवस चालते. मुलाखत दोन टप्यांत घेतली जाते.

सैन्यदलांत अधिकारी होण्याचे फायदे:

एक सैन्य अधिकारी म्हणून काम करत असतांना तरुणांना विविधतेने नटलेला आपला संपूर्ण देश पहाण्याची तसेच कामानिमित्त विदेशात जाण्याचीही संधी मिळते. सर्व प्रकारचे साहसी खेळ उदा. पैरा जंपींग, रिव्हर राफ्टींग, स्कुबा डायव्हिंग, रोप क्लायंबींग, ट्रेकिंग, बर्फावरील स्किईंग तसेच रायफल शुटींग, हॉर्स रायडींग, गोल्फ, पोलो, हॉकी, फुटबॉल व इतर सर्व खेळ खेळण्याची संधी मिळते. 
सातव्या वेतन आयोगा नुसार दरमहा पगारा व्यतिरिक्त इतर भत्ते, रहाण्यासाठी क्वार्टर्स, सी.एस.डी. कॅन्टिनची सुविधा, पेन्शन तसेच वर्षात भरपूर रजा, अभ्यासासाठी पगारी रजा, देश पातळीवर नावाजलेल्या मैनेजमेंट कॉलेज मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राखीव जागा इ. सुविधा मिळतात. येथील अधिकार्यांना जगातील नवीन तंत्रज्ञान हाताळण्याची संधी मिळते. अतिप्रगत बंदुका, नौदलातील  लढाऊ जहाजे, पाणबुडी तसेच हेलीकॉप्टर व ध्वनिपेक्षाही वेगाने उडणारे लढाऊ विमाने चालविण्याची संधी मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे येथे काम करण्याचे समाधान मिळते.

अर्ज कधी करावे:

जून मध्ये १२ वी ला प्रवेश घेणारे तसेच १२ वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जून महिन्यात एन. डी. एच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यांची एन. डी. ए. प्रवेशासाठी परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी आपली ११ वीची किंवा १२ वीची परीक्षा झाल्यानंतर लगेच मे महिन्यापासून एन. डी. ए. च्या प्रवेश परीक्षेची आणि मुलाखतीची अंतिम तयारी सुरु करायला हवी. यंदा १२ वीला शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एन. डी. ए. साठी अर्ज केला आहे त्यांची प्रवेश परीक्षा एप्रिल मध्ये घेण्यात येइल. या विद्याथ्यांना १२ वीची परीक्षा झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्याचा उपयोग त्यांनी एन. डी. ए. च्या तयारीसाठी करावा.  

शब्दांकन- संजय पोतदार, निवृत  सार्जंट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com