esakal | हायवेवर वाहन बंद पडलं किंवा पेट्रोल संपलं? "अशी' मिळवा तत्काळ मदत | Highway Security
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावरून वाहन चालवताय ! नियम मोडल्यास 'इतका' बसेल दंड

कोणताही निकष न लावता अडचणीतील वाहनचालकास तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जवळील टोल नाक्‍यांवर असणार आहे.

हायवेवर वाहन बंद पडलं किंवा पेट्रोल संपलं? 'अशी' मिळवा तत्काळ मदत

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राष्ट्रीय महामार्गांवरून (National Highway) प्रवास करताना अचानकपणे तांत्रिक बिघाड झाला आणि वाहन बंद पडल्यास अथवा इंधन (Fuel) संपल्यास 1033 या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास संबंधितांना तत्काळ मदत दिली जाते. परंतु, काहीवेळा संबंधित वाहनचालकाकडे टोल भरल्याची पावती अथवा फास्टॅगचा (Fastag) मेसेज असावा, अशी अट घातली जाते. मात्र, कोणताही निकष न लावता अडचणीतील वाहनचालकास तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जवळील टोल नाक्‍यांवर असणार आहे.

हेही वाचा: सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी 660 हेक्‍टर जमीन होणार संपादित!

महामार्गावरून लांबचा प्रवास करताना काहीवेळा तांत्रिक बिघाडीमुळे वाहन जागेवरच बंद पडते. काहीवेळा इंधन संपल्याने वाटेतच वाहन थांबवावे लागते. जवळपास काहीही सोय नसल्याने मध्यरात्री वाहन व त्यातील प्रवासी अडकून पडतात. नातेवाईक दूर अंतरावर असल्याने त्यांनाही काही वेळात त्या ठिकाणी येता येत नाही. अशावेळी टोल पावतीवरील टोल फ्री क्रमांकावर कॉल करा अथवा 1033 या क्रमांकावर कॉल केल्यास त्यांना लगेचच मदत पुरविली जाते. वाहनचालकाला किती इंधन लागते, ते त्याने सांगितल्यास त्यांना तेवढे इंधन पुरविले जाते. परंतु, त्याचे पैसे संबंधित वाहनचालकाकडून घेतले जातात. दुसरीकडे वाटेतच वाहन बंद पडल्याने अपघाताची भीती असते. त्या वेळी क्रेनच्या सहाय्याने ते वाहन बाजूला केले जाते. तसेच पाच-दहा किलोमीटरपर्यंत गॅरेज असल्यास त्या ठिकाणी ते वाहन सोडले जाते, असेही राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. अपघातानंतर रुग्णवाहिकादेखील उपलब्ध करून दिली जाते, असेही त्यांनी सांगितले.

महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास जवळील टोल नाक्‍यांकडून संबंधितांना काही वेळातच मदत मिळते. त्या वाहनचालकाकडे टोल भरल्याची पावती अथवा मेसेज असावाच, असा निकष लावून कोणीही मदत नाकारू नये.

- संजय कदम, संचालक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, सोलापूर

  • ठळक बाबी...

  • महामार्गावरून जाताना वाटेतच इंधन (पेट्रोल-डिझेल) संपल्यास टोल फ्री क्रमांकावर करा कॉल

  • महामार्गावरून प्रवास करताना वाहनाचा तांत्रिक बिघाड झाला अन्‌ गॅरेज दूर असल्यासही मिळेल मदत

  • वाहनाचा अपघात होऊन जखमी झाल्यास त्या टोल फ्री क्रमांकावरून उपलब्ध होईल रुग्णवाहिका

  • 1033 या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यानंतर संबंधित टोल नाक्‍याकडून पुरविली जाते मदत

  • वाहनचालकाकडे टोल भरल्याची पावती, फास्टॅगचा मेसेज असो किंवा नसो, मदत मिळतेच

loading image
go to top