
पालकांच्या फायद्याची पंचसूत्री! मुलांचे आयुष्य बिघडवतोय मोबाईलचा अतिवापर; ‘पंचसूत्री’मुळे घडेल तुमच्या चिमुकल्यांचे भविष्य
Mobile Phone Addiction : सध्या लहान मुलांचे सर्वात आवडते खेळणे म्हणजे मोबाईल फोन. पूर्वी आई-वडिलांच्या पिशवीतील खाऊची वाट पाहणारी मुले आता पालकांच्या खिशातील मोबाईल शोधत आहेत.
ती आई-वडिलांची आतुरतेने वाट पाहतात खरे; पण तुमची नव्हे, तर मोबाईलची वाट पाहू लागली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मैदानी खेळ विसरलेल्या मुलांचे मित्रदेखील खूप नाहीत.
उन्हाळा सुटीत तरी पालकांनी ‘पंचसूत्री’चे तंतोतंत पालन करून शाळा सुरु होण्यापूर्वी मुलांची मोबाईलची सवय तोडावी, अशी अपेक्षा आहे, आणि हिताचे ठरणारे आहे.
1. जेवताना मोबाईल हाती देऊ नकाच
लहान मुलांच्या हातातील मोबाईल घेण्याचा प्रयत्न केल्यास ते रडतात, उड्या मारतात, हात-पाय आपटतात, रागावून बोलतात, काहीजण अक्षरश: जमिनीवर लोळतात. मुलांना बालवयात चांगल्या सवयी लागाव्यात, यात पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते.
परंतु, मुलगा जेवत नाही म्हणून त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. मग, मोबाईल पाहता-पाहता आई घास भरवते. त्यावेळी जेवणाकडे लक्ष नसते आणि पोट भरल्याचेही त्यांच्या लक्षात येत नाही.
मुलगा जेवल्याचे समाधान पालकांच्या चेहऱ्यावर असते. पण, नंतर पोट दुखण्याचे कारण शोधत बसतात. जेवताना मोबाईल पाहण्याच्या सवयीचे रूपांतर व्यसनात झाल्यास अडचणी वाढू शकतात.
2. चिमुकल्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी मोबाईल नकोच
रडणाऱ्या मुलांना शांत करण्यासाठी पालक त्यांना मोबाईल देतात. मोबाईल दिल्यावर मुले लगेचच शांत होतात. मोबाईलमुळे मुले चिडखोर होत आहेत. पूर्वी आई-वडील बाजारातून जेव्हा घरी यायचे, त्यावेळी मुलांची नजर त्यांच्या हातातील सामानाच्या पिशवीकडे असायचे.
त्यांना उत्सुकता असायची की आई-वडिलांनी काय खाऊ आणला आहे. आता मुले आई- वडिलांची वाट पाहतात, पण त्यांचे सगळे लक्ष त्यांच्याजवळील मोबाईलकडेच असते.
सततच्या मोबाईल वापरामुळे मोबाईलमधील किरणांच्या प्रखर प्रकाशामुळे कमी वयातच चष्मा लागण्याची दाट शक्यता असते. स्मरणशक्ती कमी होणे, हाताची बोटे दुखणे, पाठदुखीचा पण त्रास त्यांना सुरु होतोय.
3. मुलांना एकलकोंडी होण्यापासून वेळेत रोखा
मोबाईल घेतल्यावर कोणाचाही व्यत्यय नको, म्हणून मुले एकांतात बसतात. ती इतरांमध्ये मिसळत नाहीत. त्यामुळे ती एकलकोंडी होतात. मोबाईलच्या अतिसवयीमुळे ती मैदानावर खेळायला न जाणेच पसंत करतात. त्यामुळे त्यांचा शारीरिक व्यायाम होत नाही.
रात्री झोपही लवकर येत नाही. तसेच मोबाईलच्या नादात इतर मुलांमध्ये न मिसळल्यामुळे त्यांची वैचारिक पातळी विकसित होत नाही. अशा मुलांचे मित्रही कमीच असतात आणि जे असतात तेही मोबाईलवरील गेम, मोबाईलवर काय केले, काय पाहिले? अशाच गप्पा मारतात.
मुलांमध्ये एकलकोंडीपणा वाढू नये म्हणून मोबाईलची सवय रोखण्याचे मोठे आव्हान पालकांसमोर आहे.
4. मुलांची कला, छंद जोपासा, चिंता मिटेल
घरी असताना पालकांनी आपला जास्तीतजास्त वेळ मुलांसाठीच देणे महत्त्वाचे आहे. घरी मुलांना चित्रकला, रंगकाम, हस्तकला, संगीत, नृत्य, वादन, इनडोअर व आउटडोअर गेम्स, पझल, हस्ताक्षर, वाचन अशा गोष्टी शिकवायला हव्यात.
मुले त्यात रमतील आणि त्यातून त्यांची आवड-निवडही लक्षात येईल. एकमेकांशी प्रेमाने गप्पा मारल्यास विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यांनाही पालक आपल्यासोबत असल्याचा विश्वास वाटेल. तसेच त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होऊन ते हुशार होतील.
5. पालकांनी दिलेला वेळ मुलांचे भविष्य घडवेल
कुठलीही सवय आपले मूळ पक्के करण्यापूर्वीच ती नष्ट करणे जरुरी असते. मोबाईलच्या अतिआहारी गेलेली अनेक मुले नैराश्याचे शिकार होत असून काहींनी जीवन देखील संपविले आहे.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी घरी पालकांनी मोबाईलचा वापर टाळून त्यांना भरपूर वेळ द्यायला हवा. त्यांच्या चांगल्या सवयी, छंद शोधून त्याला प्रोत्साहन द्यावे. त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधावा. त्यातून ती एकलकोंडी होणार नाहीत.
बालरोगतज्ज्ञ डॉ. शिरशेट्टी म्हणतात...
पूर्वी लहान मुले पाढे, नातेवाईकांचे क्रमांक, गावी जाणाऱ्या बसचे नंबर व वेळ, जवळच्या व्यक्तींचे वाढदिवस, बोर्डाचा कोणता पेपर कधी आहे, अशा सर्वच गोष्टी पटकन लक्षात ठेवत होती.
त्यातून वैचारिक पातळी व स्मरणशक्तीला वाव मिळत होता. पण, आता सर्वकाही मोबाईलमध्ये उपलब्ध असल्याने आणि त्याची अतिसवय मुलांना लागल्याने स्मरणशक्ती कमी होत आहे.
आरोग्य बिघडत असून नातेसंबंधात दुरावा निर्माण होत आहे, असे भयावह चित्र समाजात पाहायला मिळत असल्याची खंत बालरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली शिरशेट्टी यांनी व्यक्त केली. तसेच पालकांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोबाईलचा अतिवापर कमी करायला हवा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
घरात दररोज म्हणावे, ‘शुभं करोति कल्याणम’...
सुख, शांती, समाधान टिकून राहावे, यासाठी घरातल्या लहान बालकांना सोबत घेऊन मोठ्या वडिलधाऱ्या व्यक्तींनी दररोज सायंकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर हात जोडून शुद्ध अंतःकरणाने ‘शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोsस्तुते ।’ म्हणावे. त्यामुळे घरात सुख शांती येते व ऐश्वर्य नांदते, असे अध्यात्मात सांगितले आहे.