
तुम्ही भाजपमध्ये असा किंवा कोठेही असा ज्यांनी चूक केली असेल त्याची चौकशी होईल.
Devendra Fadnavis : संदीप देशपांडेंनी काही शंका व्यक्त केल्या; फडणवीसांनी दिली महत्वाची अपडेट
Devendra Fadnavis News : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यावरील कारवाईचा निषेध करत विरोधी पक्षातील नऊ नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलंय.
तपास यंत्रणांचा वापर करत विरोधकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी या पत्राद्वारे केला आहे. तसंच देश हुकुमशाहीच्या दिशेनं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सूचक उत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपमध्ये (BJP) आलं म्हणून कोणाची चौकशी बंद होत नाही. तुम्ही भाजपमध्ये असा किंवा कोठेही असा ज्यांनी चूक केली असेल त्याची चौकशी होईल आणि एखाद्यावर चुकीची कारवाई झाली असेल तर कोर्ट आहेच. कोर्ट त्यासंदर्भात निश्चितपणे न्याय देईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणाबाबतही फडणवीस यांनी महत्वाची अपडेट दिली आहे. संदीप देशपांडेंनी काही शंका व्यक्त केल्या आहेत. पोलीस त्यासंदर्भात चौकशी करत आहे. लवकरच आपल्याला यातलं सत्य समजेल, असं फडणवीसांनी म्हटलंय. दोन दिवसांपूर्वी मनसेच्या संदीप देशपांडेंवर अज्ञातांनी हल्ला केला होता, त्यात ते जखमी झाले आहेत. त्याची चौकशी सध्या पोलीस करत असून काहीजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
PM मोदींना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
2014 मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर देशात विरोधी पक्षांतील नेत्यांवर कारवाईचं प्रमाण वाढलंय. विरोधी पक्षातील नेत्यांवर मोठ्या प्रमाणात खोटे आरोप करण्यात आले, त्यांना अटक करण्यात आली. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यापैकी ज्या राजकीय नेत्यांनी भाजपात प्रवेश केला, त्यांच्यावर पुढं कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, सुवेंदी अधिकारी, मुकूल रॉय, नारायण राणे यांचा समावेश आहे, असा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.