
Devendra Fadanvis : फडणवीसांच्या बाजूला बसून रोहित पवारांचं खास ट्वीट; म्हणाले, पक्षभेद विसरून…
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने 5 गडी राखून विजय मिळवला आहे. केएल राहुलची 75 धावांच्या शानदार नाबाद खेळी आणि रवींद्र जडेजाच्या 45 धावांनी टीम इंडियाला हा विजय मिळवून दिला .
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ केवळ 188 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 39.5 षटकांत 5 विकेट्स गमावून सामना जिंकला. या विजयासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
दरम्यान या सामन्यात चित्रपट, राजकारण, क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज आणि उद्योगपतींचा मेळा पाहायला मिळाला. हा सामना पाहण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा आणि बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगन यांनी देखील सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावली होती.
राज्याच्या राजकारणात एकमेकांसमोर उभे ठाकत राजकारण करणारे दोन नेते एकत्र आल्याचे देखील यावेळी पाहायला मिळाले. या सामन्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे एकत्र आल्याचे दिसले.
मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी बसलेला एक फोटो रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.हा क्रिकेट सामना बघतानाचा फोटो रोहित पवार यांनी ट्वीट केला आहे. तसेच या फोटोला रोहित पवारांनी कॅप्शनही अत्यंत सूचक असं दिलं आहे.
'पक्षभेद विसरून सर्वांना एकत्र यायला भाग पाडतो तो खेळ असतो आणि महाराष्ट्रात नेहमीच असं खिलाडू वातावरण बघायला मिळतं. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर इंडिया-ऑस्ट्रेलिया मॅचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्यासोबतचा असाच एक क्षण…' असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.