भारतातून 9.67 लाख टन साखर निर्यात ! यंदा तब्बल 60 लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट 

प्रदीप बोरावके 
Tuesday, 9 February 2021

केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत प्रतिक्विंटल 600 रुपये अनुदान साखर निर्यातीस मिळणार आहे. त्यानुसार यावर्षी 60 लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 24 लाख टन साखर निर्यातीसाठी करार झाले आहेत. 

माळीनगर (सोलापूर) : चालू मोसमात भारतातून विविध देशात 7 फेब्रुवारी अखेर 9.67 लाख टन साखर निर्यात झाली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. 

इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, सोमालिया, संयुक्त अरब अमिराती, न्यूझीलंड, टांझानिया, सौदी अरेबिया, नेदरलॅंड, केनिया, मलेशिया आदी देशांना साखर निर्यात करण्यात आली आहे. 3.76 लाख टन कच्ची साखर, 5.65 लाख टन पांढरी साखर तर 0.26 लाख टन रिफाइन्ड साखर अशी एकूण 9.67 लाख टन साखर निर्यात झाली आहे. इंडोनेशियाला सर्वाधिक साखर निर्यात करण्यात आली आहे. 

केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत प्रतिक्विंटल 600 रुपये अनुदान साखर निर्यातीस मिळणार आहे. त्यानुसार यावर्षी 60 लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 24 लाख टन साखर निर्यातीसाठी करार झाले आहेत. गतवर्षी भारतातून 59 लाख टन साखर निर्यात झाली होती. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी यंदा आतापर्यंत सात लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. साखर निर्यात योजना जाहीर करण्यास या वेळी उशीर झाला. त्यामुळे साखर निर्यातीस अजून गती मिळाली नाही. साखर निर्यात योजनेचा वेळेत निर्णय झाला असता तर आतापर्यंत त्यासाठी दुपटीने करार झाले असते. 

जागतिक बाजारात साखरेला सध्या चांगले दर आहेत. जगात साखर उत्पादनात प्रथम क्रमांकावर असलेल्या ब्राझील, थायलंड या देशाची साखर अजून बाजारात आलेली नाही. ब्राझीलची साखर एप्रिलमध्ये बाजारात येते. ब्राझीलचा इथेनॉल उत्पादनाकडे अधिक कल राहतो. थायलंडमध्ये यंदा प्रतिकूल हवामानामुळे साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भारताला या वेळी साखर निर्यातीला चांगली संधी आहे. 

साखर निर्यात (लाख टनामध्ये) 

  • इंडोनेशिया : 3.06 
  • अफगाणिस्तान : 2.30 
  • श्रीलंका : 1.51 
  • सोमालिया : 1.00 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India has set a target of exporting sixty lakhs tonnes of sugar this year