Indian Railway : ‘रेल्वे वुमन’ची सर्वोच्च भरारी

त्यांचा जन्म १८ सप्टेंबर १९६३ रोजी दिल्लीत झाला. याच महिन्यात त्या निवृत्त होणार होत्या; परंतु सरकारने त्यांच्या रेल्वेतील महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदासह सेवा विस्ताराची संधी दिली
jaya varma
jaya varma sakal

Indian Railway News : जगातील रेल्वे जाळ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या आणि सुमारे १८ विविध विभागांमध्ये पसरलेल्या भारतीय रेल्वेचे नेतृत्व प्रथमच एका महिलेकडे आले आहे. भारतीय रेल्वे व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जया वर्मा-सिन्हा यांची नुकतीच रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली.

भारतीय रेल्वेची स्थापना १२ सप्टेंबर १८३७ रोजीची; तर रेल्वे बोर्डाची १९०५मधील. रेल्वेच्या १८६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच रेल्वेतील सर्वोच्च पदावर महिला विराजमान झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने त्यांच्या नावाला मंजुरी दिली.

त्या गेल्या ३५ वर्षांपासून रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. ओडिशामध्ये २ जून २०२३ रोजी झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघाताचे सखोल विश्लेषण करून त्याचे सादरीकरण पंतप्रधान कार्यालयात केल्याने जया वर्मा प्रकाशझोतात आल्या.

तत्पूर्वी बांगलादेशातील ढाका येथे भारतीय दूतावासात रेल्वे सल्लागारपदावर कार्यरत असताना ढाका ते कोलकातादरम्यान ‘मैत्री रेल्वे सेवा’ सुरू करण्याची सर्वांत मोठी कामगिरी त्यांनी बजावली आहे.

१९८६मध्ये आयपीएस परीक्षा देऊन जया वर्मा नागरी सेवा क्षेत्रात आल्या. या परीक्षेच्या अंतिम निकालात त्यांची श्रेणी सर्वोच्च होती. त्यांना भारतीय पोलिस दल किंवा आयकर, महसूल विभागात थेट स्थान मिळू शकत होते; परंतु त्यांनी भारतीय रेल्वेची निवड केली. त्यांना भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत (आयआरटीएस) स्थान मिळाले.

‘आयआरटीएस’मध्ये तेव्हा एखाद्-दुसरी महिला कार्यरत असायची. ‘यूपीएससी’ परीक्षेत सर्वोच्च श्रेणी मिळवणाऱ्या महिला एक तर ‘आयएएस’ किंवा ‘आयपीएस’नंतर ‘आयआरएस’ अर्थात महसूल विभागाला प्राधान्य देतात. रेल्वे वाहतूक सेवेत मात्र भरउन्हात रेल्वेरुळांवर ट्रॉलीद्वारे फिरावे लागत असे. अनेक विभागांशी समन्वय साधावा लागे.

हे आव्हान स्वीकारण्याचा निश्चय जया वर्मा यांनी केला. १९९८मध्ये रेल्वे सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी कठोर प्रशिक्षण घेतले. उत्तर रेल्वेच्या अलाहाबाद विभागात जबाबदारी स्वीकारली. उत्तर प्रदेशातील कानपूर क्षेत्राच्या सहायक आयुक्तपदाची त्यांना पहिली जबाबदारी मिळाली. त्यानंतर अलाहाबाद रेल्वे मुख्यालयात विभागीय व्यावसायिक संचालकपदी रुजू झाल्या.

जया वर्मा यांनी स्वत: ‘आयपीएस’ची नोकरी नाकारली; मात्र त्यांचे पती नीरज सिन्हा ‘आयपीएस’ अधिकारी आहेत. जया वर्मा यांना अनेक आव्हानात्मक प्रकल्पांमध्ये नियुक्त्या मिळल्या आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांचा रेल्वेच्या संगणकीकरणातही मोलाचा वाटा आहे.

तत्कालीन रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांच्या कारकिर्दीत रेल्वेमध्ये संगणकीकरण सुरू झाले. संगणकीकरणाला चालना देण्यासाठी रेल्वे माहिती प्रणाली केंद्र, अर्थात ‘क्रिस’ची स्थापना करण्यात आली. ‘क्रिस’मध्येही जया यांनी विविध पदे भूषवली. दक्षिण पूर्व रेल्वे, उत्तर रेल्वे आणि पूर्व रेल्वेमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.

सियाल्दामध्ये विभागीय व्यवस्थापक पदावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांचा जन्म १८ सप्टेंबर १९६३ रोजी दिल्लीत झाला. याच महिन्यात त्या निवृत्त होणार होत्या; परंतु सरकारने त्यांच्या रेल्वेतील महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदासह सेवा विस्ताराची संधी दिली. ३१ ऑगस्ट २०२४पर्यंत त्या अध्यक्षपदावर राहतील. रेल्वेच्या कार्यक्षम संचालनाबरोबरच मॉडेल स्थानके पूर्ण करणे आणि बुलेट ट्रेनचे स्वप्न साकारणे अशी पुढील झेप त्यांना घ्यायची आहे.

(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com