esakal | लेह-लडाख सीमेवर जवान सचिन जाधव यांना वीरमरण, दुसाळेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

लेह-लडाख सीमेवर जवान सचिन जाधव यांना वीरमरण, दुसाळेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

दुसाळे (ता. पाटण) येथील भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे नाईक सचिन जाधव हे 4 ऑगस्टला 45 दिवसांच्या सुट्टीवर गावी आले होते. मात्र, सुट्टी पूर्ण होण्याआधीच चीन सीमेवर वाढलेल्या हालचालींमुळे त्यांना पुन्हा बोलविण्यात आले. ते देशसेवेचा घेतलेला वसा बजावण्यासाठी पुन्हा 27 ऑगस्टला लेह-लडाख येथे 111 इंजिनिअर रजिमेंटमध्ये रुजू झाले होते.

लेह-लडाख सीमेवर जवान सचिन जाधव यांना वीरमरण, दुसाळेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

sakal_logo
By
यशवंत बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : वीर जवान नाईक सचिन जाधव अमर रहे, भारत माता की जय, जब-तक सूरज चाँद रहेगा सचिन तेरा नाम रहेगा, वंदे मातरम अशा घोषणा देत लेह-लडाख येथे चीन सीमेवर हुतात्मा झालेल्या नाईक सचिन जाधव यांच्या पार्थिवावर दुसाळे (ता. पाटण) येथे शासकीय इतमामात आज सकाळी बाराच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंनी साश्रुपूर्ण नयनांनी जाधव यांना निरोप दिला.

दुसाळे (ता. पाटण) येथील भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे नाईक सचिन जाधव हे 4 ऑगस्टला 45 दिवसांच्या सुट्टीवर गावी आले होते. मात्र, सुट्टी पूर्ण होण्याआधीच चीन सीमेवर वाढलेल्या हालचालींमुळे त्यांना पुन्हा बोलविण्यात आले होते. ते देशसेवेचा घेतलेला वसा बजावण्यासाठी पुन्हा 27 ऑगस्टला लेह लडाख येथे 111 इंजिनिअर रजिमेंटमध्ये रुजू झाले होते. तेथे चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षमय चकमकीत त्यांना बुधवार दि. 16 हौतात्म्य आले. ही दुःखद खबर दुसाळे गावी समजताच गावावर शोककळा पसरली. तसेच तारळे विभागही शोकसागरात बुडाला, तर तालुक्यासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत होती. 

हुतात्मा सचिन जाधव यांना साश्रूनयनांनी निरोप!

वीर जवान नाईक सचिन जाधव यांचे पार्थिव लेह-लडाखवरून पुण्यात विमानाने आणले. त्यानंतर पुणे येथून रूग्णावाहिकेने सातारा व आज सकाळी सात वाजता तारळे येथे आणण्यात आले. येथूनच सजविलेल्या ट्रॅकटरमध्ये जाधव यांचे पार्थिव ठेवण्यात आले. येथे तारळे ग्रामपंचायतीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मग तारळेतूनच दुसाळेकडे पार्थिव ट्रॅक्टर मधून मार्गस्थ झाले. शेकडो तरुण यावेळी ट्रॅकटर बरोबर चालत दहा किलोमीटरवर असलेल्या दुसाळे गावी पोहोचले. मार्गात विविध ठिकणी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दुसाळेत सकाळी दहा वाजता पार्थिव पोहोचले. जाधव यांच्या घरासमोर कुटुंबीयांच्या दर्शनासाठी अर्धा तास पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी शवपेटी उघडून कुटुंबीयांना चेहरा दाखविण्यात आला. त्यावेळी कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकत होता. 

ते देशासाठी लढले, अमर हुतात्मे झाले; सचिन जाधव अमर रहे!

दोन दिवसांपासून रोखलेला हुंदक्याचे रूपांतर अक्रोशात झाले होते. यावेळी उपस्थित सर्वजण हेलावून गेले होते. वृद्ध आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ यांच्या दुःखाला पारावर उरला नव्हता. तेथे पोलिसांनी व सैन्याने मानवंदना दिल्यावर, गावातून अंत्ययात्रेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकी दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी पार्थिव देहाचे दर्शन घेतले. यावेळी अमर रहे अमर रहे वीर जवान सचिन जाधव अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. 

चीन-भारत संघर्ष : महाराष्ट्रातील जवान हुतात्मा

तासभारात ही अंत्ययात्रा नियोजित स्थळी पोहोचली. याठिकाणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय पाटील, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कर्नल पराग गुप्ते, वडील संभाजी जाधव, भाऊ किरण जाधव, सरपंच विठ्ठल जाधव आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यानंतर पोलिसांच्या वतीने हवेत तीन फ़ैरी झाडून मानवंदना देण्यात आली. तर बारा वर्षाचा मुलगा आयुष याने भडाग्नी दिल्यावर, सैन्यदलाच्या वतीने तीन फ़ैरी झाडून मानवंदना देण्यात आली. बाराच्या सुमारास हुतात्मा सचिन जाधव अनंतात विलीन झाले.

चिनी ड्रॅगनला चारीमुंड्या चित करु : माजी सैनिकांचं सळसळलं रक्त

वरुण राजनेही धाडले अश्रू
मिरवणूक मार्गावर ठिक-ठिकाणी रांगोळी, पेंटींग काढण्यात आले होते. फुलांच्या पाकळ्या मार्गावर अंथरल्या होत्या. अबाल वृद्धांच्या घोषणांचा दऱ्या खोऱ्यात आवाज निनादत होता. मिरवणूक अंत्यस्थळी येत असताना वरुण राजानेही हजेरी लावली. जसे काही इतरांप्रमाणे त्यालाही दुःख झाले होते. यानिमित्ताने वरुण राजानेही आपल्या अश्रूंनाच वाट मोकळी करून दिली.

संपादन : बाळकृष्ण मधाळे