
मुंबई : अमेरिकेने सुरू केलेल्या आयातशुल्क युद्धात भारताचा विकास कायम राहावा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपोदरात पाव टक्का कपात करून तो सहा टक्क्यांवर आणला. चलनवाढ आटोक्यात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले. पतधोरण समितीची आर्थिक वर्ष २०२५-२६ ची पहिली द्वैमासिक बैठक आज झाली, त्यात एकमताने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बँकेची ही सलग दुसरी व्याजदर कपात असून फेब्रुवारीच्या बैठकीतही पाव टक्का दरात कपात करण्यात आली होती.