...अन् टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या, यूटर्न घेत इंदुरीकरांनी सुरू केली जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indurikar

...अन् टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या, यूटर्न घेत इंदुरीकरांनी सुरू केली जनजागृती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जालना : इंदुरीकर महाराजांनी कोरोना लसीकरणाबाबत (corona vaccination) किर्तनामध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी लस घेतली नाही आणि घेणार नाही. मन खंबीर असेल तर कोरोना होत नाही, असं ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. आता इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या वक्तव्यावरून युटर्न घेत कोरोना जनजागृतीला (corona vaccination awareness campaign) सुरुवात केली आहे.

हेही वाचा: ''कोरोना लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही" - इंदुरीकर महाराज

आपण कोरोनाची लस घेतली नाही आणि घेणार सुद्धा नाही. प्रत्येक माणसाची रोगप्रतिकारशक्ती आणि मेंदूची क्षमता वेगवेगळी असते. काही होतच नाहीतर लस घेऊन काय करणार? कोरोनावरील एकच औषध म्हणजे मन खंबीर ठेवा, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर स्वतः राजेश टोपे यांनी इंदुरीकर महाराजांशी चर्चा करू असं म्हटलं होतं. त्यानंतर इंदुरीकर महाराज दिवसभरात होणाऱ्या किर्तनातून कोरोना लसीकरणासाठी जनजागृती करतील, अशी माहितीही टोपेंनी दिली होती. आता इंदुरीकरांनी त्यांच्या वक्तव्यावरून युटर्न घेत कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली.

इंदुरीकर महाराजांचे जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे किर्तन होते. त्यावेळी त्यांनी इंदुरीकरांची हरीपाठाची एक आणि टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या, कोरोनामुक्त व्हा, असा सल्ला नागरिकांना दिला आहे. कोरोनाला हरविण्यात पोलिस, डॉक्टर, सामाजिक संस्थांचं मोठं योगदान आहे. खरा कोरोना योद्धा राजेश टोपे असल्याचेही इंदुरीकर म्हणाले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता महाराष्ट्रातील लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे धार्मिक नेते आणि बॉलीवूड सेलिब्रिटींच्या माध्यमातून कोरोना जनजागृती करणार आहोत. त्यासाठी अभिनेता सलमान खानला देखील पुढे आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपेंनी दिली होती. त्यानंतर लसीकरणाच्या जनजागृतीमध्ये इंदुरीकर महाराजांचा समावेश करण्यात आला.

loading image
go to top