मितेश भांगडिया यांनी विजय वडेट्टीवारांविरुद्ध दाखल केली याचिका, न्यायालयाने दिले हे आदेश...

राजेश चरपे
Saturday, 18 July 2020

वडेट्टीवार यांनी 25 जानेवारी 2007 रोजी पुन्हा एकदा पासपोर्टसाठी नागपूर कार्यालयात अर्ज केला होता. त्यात यापूर्वी अर्ज केला नव्हता, असे नमूद केले होते. या दुसऱ्या अर्जातदेखील वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरुद्धच्या फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नाही.  तसेच पोलिसांकडून नकारात्मक अहवाल आल्यानंतरही केवळ शपथपत्राच्या आधारे विजय वडेट्टीवार पासपोर्ट देण्यात आला. 

नागपूर : सद्या देशात आणि विविध राज्यांत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध राज्यांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी एक सरकार धडपडत असल्याचे दिसून येत आहे. असे असताना नागपुरातील राजकारण वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. येथे काही राजकीय नेते चक्‍क गुंडगिरी करीत खंडणी मागत असल्याचे पुढे आले आहेत. राजकीय पक्षाच्या नावाचा लाभ घेत नागरिकांना लुबाळत आहेत. असे असताना चक्‍क माजी आमदारच आमदाराविरुद्ध न्यायालयात गेल्याने पुन्हा चर्चेला नवीन विषय मिळाला आहे. 

राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अवैध पासपोर्ट प्राप्त केला आहे. तो रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका माजी आमदार मितेश भांगडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केली आहे. याचिकाकर्ते भांगडिया यांच्यावतीने बाजू मांडताना ऍड. श्रीरंग भांडारकर यांनी खंडपीठाला सांगितले की, पासपोर्ट कार्यालयात अर्ज केला तेव्हा त्यांनी फौजदारी गुन्ह्यांची माहिती दडवून ठेवली. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध 10 फौजदारी गुन्हे होते.

अधिक माहितीसाठी - दोन वर्षांपासून होते प्रेमसंबंध, तिने लग्नाचा तगादा लावला आणि...

पोलिसांकडून एक तपासणी अहवाल पासपोर्ट अधिकाऱ्यांना मिळाला. तेव्हा पासपोर्ट अधिकारी व्ही. बी. कांबळे यांना विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्धच्या प्रलंबित फौजदारी गुन्ह्यांची माहिती मिळाली. त्यावरून वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरुद्धची गुन्ह्यांची माहिती लपवून ठेवली, असे स्पष्ट होते, असा दावा याचिकेत केला आहे. 

त्यानंतर वडेट्टीवार यांनी 25 जानेवारी 2007 रोजी पुन्हा एकदा पासपोर्टसाठी नागपूर कार्यालयात अर्ज केला होता. त्यात यापूर्वी अर्ज केला नव्हता, असे नमूद केले होते. या दुसऱ्या अर्जातदेखील वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरुद्धच्या फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नाही.  तसेच पोलिसांकडून नकारात्मक अहवाल आल्यानंतरही केवळ शपथपत्राच्या आधारे विजय वडेट्टीवार पासपोर्ट देण्यात आला.

असे का घडले? - इज्जत वाचविण्यासाठी तिने घेतला रुद्रवतार आणि मग काय घडले?

शिक्षणाचे दिले खोटे कारण

विदेशात उच्च शिक्षणासाठी जाणार आहे, असे कारण देत विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्ट प्राप्त केला. परंतु, वडेट्टीवार हे केवळ दहावी पास आहेत. त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे खोटे कारण देत पासपोर्ट घेतला, असा आरोप याचिकेत केला आहे. 

उत्तर सादर करण्याचे आदेश

राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा पासपोर्ट बनावट असलेल्या पासपोर्टच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने केंद्रीय गृह मंत्रालय, नागपूर पोलिस आयुक्त व नागपूर पासपोर्ट अधिकारी यांना नोटीस बजावली आहे. त्यावर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे.

जाणून घ्या - आयुक्त मुंढेच्या नावाने बघा काय सुरू आहे नागपुरात?

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inquire about Vijay Vadettiwar's passport