

तात्या लांडगे
सोलापूर : राज्याच्या परिवहन विभागाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्वच जुन्या वाहनधारकांनी आपल्या वाहनाला ‘एचएसआरपी’ (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविणे आवश्यक आहे. त्यासाठी पाचवेळा मुदतवाढ दिली, तरीपण सोलापूर जिल्ह्यातील दहा लाखांपैकी अवघ्या पावणेतीन लाख वाहनधारकांनीच नंबरप्लेट बदलली. अजूनही शहर- जिल्ह्यातील सात लाख वाहनांना जुनीच नंबरप्लेट आहे. नंबरप्लेट न बदललेल्या वाहनांची संख्या राज्यात सुमारे ३५ लाखांवर आहे. त्यांच्यावर १८ फेब्रुवारीनंतर दंडात्मक कारवाईची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी आता परिवहनचे संकेतस्थळ सुरू झाले आहे. ज्या वाहनांना नवीन नंबरप्लेट बसविलेले नाहीत, त्यांनी त्या ठिकाणी नोंदणी करावी, असे आवाहन परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. मुदत संपली आणि तरीदेखील वाहनधारकांनी नवी नंबरप्लेट बसविली नाही तर त्यांना पहिल्यांदा एक हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यानंतर प्रत्येक कारवाईवेळी दंडाची रक्कम वाढणार आहे.
पूर्वीचा दंड प्रलंबित असल्यास दंडाची रक्कम दुसऱ्यावेळी तिप्पट, पाचपट आहे. त्यामुळे सर्वांनीच जुनी नंबरप्लेट बदलून नवीन एचएसआरपी नंबरप्लेट बसवावी, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई कधीपासून होणार, याची तारीख निश्चित नाही. पण, पुढे निश्चितपणे त्या वाहनांवर वाहतूक पोलिस, आरटीओ, महामार्ग पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होऊ शकते, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
सर्वांनी मुदतीत नंबरप्लेट बसवून घ्यावी
सोलापूर शहर- जिल्ह्यातील सुमारे दहा लाख वाहने १ एप्रिल २०१९ पूर्वीची वाहने आहेत. त्या सर्वांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवायची आहे. अनेकदा मुदतवाढ देऊनही केवळ अडीच लाख वाहनांनीच एचएसआरपी नंबरप्लेट बसविली आहे. पुढे शासनाच्या आदेशानुसार संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने मुदतीत नंबरप्लेट बसवून घ्यावी.
- विजय पाटील, सहायक परिवहन अधिकारी, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील स्थिती
‘एचएसआरपी’साठी अपेक्षित वाहने
१० लाख
नंबरप्लेट नवीन बसविलेले
२.७३ लाख
नंबरप्लेट न बदललेले
७.२७ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.