दूरचित्रवाहिन्यांना सुधारित शुल्क जाहीर करण्याचे निर्देश कायम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जारी केलेल्या नव्या दरांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या दूरचित्रवाहिन्यांना मंगळवारी न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला नाही. त्यामुळे दूरचित्रवाहिन्यांना त्यांचे सुधारित शुल्क बुधवारपर्यंत (ता. 15) जाहीर करण्याचे ट्रायचे निर्देश कायम आहेत. 

मुंबई - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जारी केलेल्या नव्या दरांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या दूरचित्रवाहिन्यांना मंगळवारी न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला नाही. त्यामुळे दूरचित्रवाहिन्यांना त्यांचे सुधारित शुल्क बुधवारपर्यंत (ता. 15) जाहीर करण्याचे ट्रायचे निर्देश कायम आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रायच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार टीव्ही चॅनेल्सचे शुल्क कितीपर्यंत असावे, याबाबतही निश्‍चित मर्यादा आखण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या शर्तीही ट्रायच्या वतीने लागू करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणतः मार्चपासून या सुधारित शुल्काची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, संबंधित शुल्क आकारणी पद्धतीला आणि नियमांना याचिकादारांसह फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. यात सोनी पिक्‍चर्स, स्टार इंडिया, डिस्ने, झी एंटरटेन्मेंट आदी टीव्ही कंपन्यांनी विरोध दर्शविला आहे. संबंधित नियमावलीला कायदेशीर आधार असून, ग्राहकांना त्यांच्या पसंतीने आणि हवे तेच चॅनेल घेता येईल, यासाठी ही तरतूद आहे, असा युक्तिवाद या वेळी करण्यात आला. न्यायालयाने ट्रायला याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले असून, सुनावणी पुढील सोमवारी (ता. 20) होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: instructions to issue revised charges to television channels are permanent