esakal | गोविंदांच्या विम्यासाठी नेत्यांचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

गोविंदांच्या विम्यासाठी नेत्यांचा पुढाकार

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिका नेत्यांचे अर्थसाहाय्य 

गोविंदांच्या विम्यासाठी नेत्यांचा पुढाकार

sakal_logo
By
उत्कर्षा पाटील

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गोविंदांना विमा कवच मिळण्यासाठी पायपीट करावी लागत नसल्याचे चित्र दिसत आहे. नेते मंडळी स्वत:हून पुढाकार घेत विमा काढून देत आहेत. आतापर्यंत 192 मंडळांच्या गोविंदांचा विमा उतरवला असून त्यातील 78 मंडळांच्या गोविंदाना नेत्यांनी विमा कवच दिले आहे. मुंबईमधील दादर, भायखळा, वरळी, मुलुंड, अंधेरी, गिरगाव या विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी गोविंदांना आर्थिक साहाय्य करत आहेत. 

मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येक गोविंदा पथकांना विमा उतरवणे बंधनकारक केले आहे. इंडियन ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी 10 लाखांचा विमा कवच देते. त्यासाठी प्रत्येक गोविंदाला 75 रुपये प्रीमियम भरावा लागतो. मागील वर्षी 44 हजारहून अधिक गोविंदांनी विमा काढला; तर या वर्षी केवळ मुंबई नाही तर पुणे, रत्नागिरी, गडहिंग्लज असे राज्याभरातून विम्यासाठी चौकशी केली जात आहे. या वर्षी विधानसभा निवडणुकींच्या तारखा येत्या काही दिवसांत जाहीर होतील. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक विभागातील नेत्यांनी सण-उत्सवातून आपला जम बसावयला सुरुवात केली आहे. 
वडाळा येथील आमदार कालिदास कोळंबकर यांनी दादर भागातील तर गिरगावमधून शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ काही गोविंदा पथकांचे विमे काढत आहेत. मलबार हिल परिसरातील गोविंदा पथकांना आमदार मंगलप्रभात लोढा, भायखळा परिसरातील गोविंदा पथकांचे बेस्ट स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी गोविंदा पथकांचा विमा उतरवला आहे. वरळीतून आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर; तर मुलुंडमधून भाजपचे खासदार मनोज कोटक गोविंदांचा विमा उतरवणार आहेत. तसेच अंधेरी, जोगेश्‍वरी, बोरिवली या भागातून लोकप्रतिनिधी गोविंदांच्या विमासाठी पुढाकार घेत आहेत. 

 
गोविंदांचा विमा काढणे बंधनकारक आहे. त्यामुळे गोविंदांचा विमा काढण्यासाठी मुंबईतील विविध भागांतील राजकीय पुढारी मदत करत आहेत. भायखळा मतदारसंघातील सर्व गोविंदा पथकांचे विमा यशवंत जाधव यांनी काढले. गोविंदांच्या विमाबरोबर कार्यक्रमस्थळीचा विमा काढण्यासाठी सर्व आयोजकांनी पुढाकार घ्यावा. 
- बाळा पडेलकर, अध्यक्ष, दहीहंडी उत्सव समन्वय समिती 

आमच्याकडे मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या परिसरातील गोविंदांचा विमा उतरवला आहे. मनोज कोटक व भाई जगताप यांनी त्यांच्या परिसरातील गोविंदांचे विमा काढण्यासाठी विचारणा केली. दापोली, कोल्हापूर, सातारा, गोवा या ठिकाणांहून गोविंदा पथकांकडून विम्याबाबत चौकशी होत आहे. 
- सचिन खानविलकर, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी 

उतरवलेला विमा 
मंगलप्रभात लोढा - 46 मंडळ 3000 गोविंदा 
यशवंत जाधव - 32 मंडळ 1850 गोविंदा 
 

loading image
go to top