अल्पबचत योजनांमध्ये ज्येष्ठांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FD Interest Rates

अल्पबचत योजनांमध्ये ज्येष्ठांना दिलासा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नव्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी (आॅक्टोबर ते डिसेंबर २०२२) मुदत ठेव, मासिक उत्पन्न योजना, किसान विकास पत्र आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अल्प वाढ केली आहे. बाकीच्या अल्पबचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले गेले आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर ७.४ टक्क्यांवरून ७.६ टक्के केल्याने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने ‘रेपो रेट’मध्ये सातत्याने वाढ केल्यानंतर विविध बँका आणि वित्तीय संस्थांनी आपल्या ठेव योजनांवरील व्याजदरात वाढ करायला सुरवात केली होती. त्या पार्श्वभूमीवर अल्पबचत योजनांच्या व्याजदरातही वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानुसार दोन वर्षीय मुदत ठेवींचा व्याजदर ५.५ टक्क्यांवरून ५.७ टक्के, तीन वर्षीय मुदत ठेवींचा व्याजदर ५.५ टक्क्यांवरून ५.८ टक्के करण्यात आला आहे. मासिक उत्पन्न योजनेवर आता ६.६ टक्क्यांएेवजी ६.७ टक्के व्याज मिळेल. किसान विकास पत्रावर ७ टक्के व्याज मिळणार असून, यातील गुंतवणूक १२३ महिन्यांत दामदुप्पट होईल. हे नवे व्याजदर १ आॅक्टोबरपासून केल्या जाणाऱ्या नव्या गुंतवणुकीवर लागू होणार आहेत.

अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मुदत ठेवी (टीडी), मासिक उत्पन्न योजना (एमआयएस), आवर्ती ठेव (आरडी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) आदी योजनांचा समावेश होतो. याशिवाय पोस्टात बचत खात्याची (एसबी) सोयदेखील असते व त्यावर सध्या वार्षिक ४ टक्के दराने व्याज दिले जाते. अल्पबचत योजना प्रामुख्याने पोस्टाच्या; तसेच निवडक बँकांच्या माध्यमातून राबविल्या जातात. या योजनांवरील व्याजदराचा केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून दर तिमाही आढावा घेण्यात येतो.

अल्पबचत योजनांचे व्याजदर (टक्क्यांत)

(आॅक्टोबर ते डिसेंबर २०२२ तिमाहीसाठी)

 • पोस्ट ऑफिस एसबी ४

 • पीपीएफ ७.१

 • एनएससी ६.८

 • केव्हीपी ७.० (१२३ महिन्यांत दुप्पट)

 • पाच वर्षीय टीडी ६.७

 • तीन वर्षीय टीडी ५.८

 • दोन वर्षीय टीडी ५.७

 • एक वर्षीय टीडी ५.५

 • एमआयएस ६.७

 • आरडी ५.८

 • एसएसवाय ७.६

 • एससीएसएस ७.६