SP सरदेशपांडेंची ‘कॉफी विथ सकाळ’मधील मुलाखत..! अवैध धंदेवाल्यांना इशारा, शेतीचे वाद कायमचे मिटणार, पोलिस ठाणी वाढणार

गावागावीतील अवैध सावकारकी, हातभट्ट्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. ‘ऑपरेशन परिवर्तन’अंतर्गत दत्तक अधिकारी नेमून हातभट्ट्यांवर धाडी टाकल्या जातील, दारूमुक्त गावांसाठी ठोस प्रयत्न होतील, अशी ग्वाही SP शिरीष सरदेशपांडे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये दिली.
SP Shirish sirdeshpande, solapur
SP Shirish sirdeshpande, solapursakal
Updated on

सोलापूर : शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आता गावागावीतील अवैध खासगी सावकारकी, हातभट्ट्या आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. ‘ऑपरेशन परिवर्तन’अंतर्गत नवीन दत्तक अधिकारी नेमून हातभट्ट्यांवर धाडी टाकल्या जातील आणि दारूमुक्त गावांसाठीही ठोस प्रयत्न होतील, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये दिली. तत्पूर्वी, ‘सकाळ’चे निवासी संपादक यांनी पोलिस अधीक्षक श्री. सरदेशपांडे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांचे स्वागत केले.

आषाढी वारीचा पहिलाच अनुभव सांगताना पोलिस अधीक्षक म्हणाले, वारी काळात वाळवंट, महाद्वार घाट, महाद्वार चौक, नामदेव पायरी, चौफळा हा मार्ग खूपच महत्त्वाचा आहे. यंदा वारीसाठी जवळपास १४ ते १६ लाख भाविक पंढरीत आलेले होते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाताना महाद्वार मार्गावर चार कपार्टमेंट केले होते. सामान्यपणे एक मिटरमध्ये चार लोक व्यवस्थित थांबू शकतात. पण, वारीच्या काळात एका मिटरमध्ये १८ ते २० लोक असतात. त्यामुळे गर्दीवरील नियंत्रणालाच प्राधान्य राहते. वारीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर हे आले होते. त्यावेळी आमच्या पोलिसांनी अतिशय चांगले काम केले. आता वारी संपल्यानंतर गावागावातील अवैध धंद्यांवर कारवाई सुरु आहे. नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या डान्सबार देखील कारवाई केली जात आहे. कोंडी परिसरातील एका कॅसिनो बारवर कारवाई करीत त्या बारचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव देखील शासनाला सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

हातभट्टी दारूबंदी आणि रस्ते अपघात कमी करण्यास प्राधान्य

गावातील भांडणे वाढण्याच्या प्रमुख कारणात ‘हातभट्टी दारू’ एक कारण आहे. आता संबंधित पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व गावच्या बीट अंमलदारांच्या माध्यमातून विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले जातील. पोलिस अधिकारी-कर्मचारी अचानक पुन्हा त्या गावांना भेटी देतील. अवैध धंद्यावंरील कारवाईसाठी पोलिस पाटलांचीही मदत घेतली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसरीकडे रस्ते अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्यालाही प्राधान्य राहील, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात नवीन ९ पोलिस ठाणी वाढीचा प्रस्ताव!

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८८६ चौरस किलोमीटर आहे. लोकसंख्या आता ३६ लाखांपर्यंत असून सध्या ग्रामीण पोलिसांची २५ ठिकाणी पोलिस ठाणी आहेत. त्याअंतर्गत जवळपास दोन हजार २०० पर्यंत पोलिसांचे मनुष्यबळ आहे. या पार्श्वभूमीवर आता करमाळा शहर व तालुका, अकलूज व श्रीपूर, सांगोला शहर व तालुका, मंगळवेढा शहर व तालुका, कुंभारी (रे नगर) येथे नवीन पोलिस ठाणी सुरु करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे, असेही श्री. सरदेशपांडे म्हणाले.

पंढरपुरात १८० क्वॉर्टर; १००० जणांची राहण्याची सोय

पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी, माघी, चैत्र व कार्तिकी वारीचा सोहळा असतो. त्यात आषाढी व माघ वारीसाठी लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीत येतात. त्यावेळी वारी नियोजनासाठी जवळपास आठ ते साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असतो. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात सात मजली दोन टॉवर बांधून मिळणार आहेत. दोन डायनिंग हॉल तेथे असतील. एक हजार जणांची राहण्याची व्यवस्था तेथे असणार आहे. बंदोबस्तासाठी बाहेरून येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची सोय होईल, असा विश्वास पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी व्यक्त केला.

‘महसूल’च्या मदतीने मिटवणार शेतीचे वाद

गावागावात शेतीच्या तथा बांधाच्या कारणातून वाद, हाणामारी, खून असे गुन्हे दाखल होतात. त्याअनुषंगाने, आता बीटनिहाय शरीराविरूद्धच्या गुन्ह्यांची माहिती संकलित केली जात आहे. पोलिस महसूल विभागाच्या मदतीने गावागावातील लोकांचे शेती व बांधाचे वाद मिटवतील, असे नियोजन आहे. जेणेकरून दाखल गुन्हे कमी होतील, भावभावकीतील भांडणे वाढणार नाहीत, न्यायालयावरील ताण कमी होईल, लोकांचा वेळ व पैसा वाचेल हा त्यामागील हेतू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ‘आरोग्या’ला प्राधान्य

माळशिरस येथील एका पोलिस अंमलदारास डायबेटिस झाला होता. त्याच्या पायाला मोठी जखम झाली होती. पण, डायबेटिस असल्याचे त्याला काही दिवसांपूर्वीच समजले होते. असा प्रसंग कोणावरही येवू नये म्हणून आता प्रत्येक तीन-सहा महिन्यातून एकदा ‘पोलिस वेल्फेअर’मधून सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील ३० वर्षांवरील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी होईल. मागील आरोग्य तपासणीत जवळपास पाचशे लोक डायबेटिसच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आता आरोग्य तपासणीला प्राधान्य राहील, असेही त्यांनी सांगितले.

वैयक्तिक माहिती...

  • मूळ गाव : अकोला

  • ‘एमपीएससी’ उत्तीर्ण : १९९७

  • पहिली पोस्टिंग : चंद्रपूर (पोलिस उपअधीक्षक)

  • आतापर्यंतच्या पोस्टिंग : चंद्रपूर, वरोरा, चाळीसगाव, लातूर, पुणे शहर, मुंबई, महाराष्ट्र पोलिस ॲकॅडमी व सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com