सोलापुरात लवकरच आयटी पार्क, अभियंत्यांचे थांबणार स्थलांतर? 74 रेल्वे, 5 महामार्गांची कनेक्टिव्हीटी, मुबलक वीज- पाणी, 14 अभियांत्रिकी कॉलेज, फाईव्ह स्टार हॉटेल, विमानसेवेची तयारी

मनुष्यबळ, पाणी, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी, राहण्याची उत्तम सोय, चिंचोळी एमआयडीसीत इमारत व अन्य एमआयडीसींमध्ये जागेची पुरेशी उपलब्धता आणि आता विमानसेवा अशा सर्व सोयी-सुविधा असतानाही स्मार्ट सोलापूरमधील तरुण-तरुणींना अद्याप आयटी पार्कची प्रतीक्षाच आहे.
solapur
आयटी पार्कsakal

सोलापूर : जिल्ह्यात नामांकित १४ अभियांत्रिकी महाविद्यालये असून त्यातून दरवर्षी पाच हजार अभियंते शिक्षण पूर्ण करतात. मनुष्यबळ, पाणी, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी, राहण्याची उत्तम सोय, चिंचोळी एमआयडीसीत इमारत व अन्य एमआयडीसींमध्ये जागेची पुरेशी उपलब्धता आणि आता विमानसेवा अशा सर्व सोयी-सुविधा असतानाही स्मार्ट सोलापूरमधील तरुण-तरुणींना अद्याप आयटी पार्कची प्रतीक्षाच आहे. सर्व सुविधांची उपलब्धता झाल्याने आगामी काळात सोलापुरात आयटी पार्क उभारतील, अशी आशा असून त्यासाठी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करतील, असा विश्वास तरूणांना आहे.

जिल्ह्यातील ११ मतदारसंघाचे तेवढेच आमदार, बहुतेकवेळा राज्याच्या मंत्रिमंडळात सोलापूरला स्थान, जिल्ह्यात दोन खासदार, राज्य व केंद्रातील सरकारमध्ये वजन असलेले जिल्ह्यात आजी- माजी लोकप्रतिनिधी आहेत. दूरदृष्टी असलेले प्रशासकीय अधिकारी असतानाही सोलापूरमध्ये आयटी पार्क नाही हे विशेष. शेजारील पुणे जिल्ह्यात आयटी पार्कची गर्दी झालेली असतानाही लोकप्रतिनिधींना आपल्या जिल्ह्यातील तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी आतापर्यंत एकही आयटी पार्क आणता आले नाही, हे दुर्दैवच.

सध्या आपल्याकडील हजारो तरुण-तरुणी बंगळूर, पुणे, मुंबईसह अन्य एमआयडीसींमधील आयटी पार्कमध्ये कार्यरत आहेत. निवडणुकीवेळी त्याच तरुण-तरुणांना बोलावणारे लोकप्रतिनिधी आतातरी स्थलांतर रोखून शहर-जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आयटी पार्क आणतील का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींना यशस्वी प्रयत्न करावेच लागतील, अन्यथा प्रत्येक निवडणुकीत माता-पित्यांना सोडून परजिल्ह्यात-परराज्यात नोकरीसाठी गेलल्या त्या तरुणांच्या कुटुंबांना आयटी पार्क सोलापुरात का आले नाही? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल हे निश्चित.

 • एवढे सगळे असूनही आयटी पार्क का नाही?

 • १) दळणवळणाची उत्तम सोय

 • सोलापूरच्या रेल्वे स्थानकावरून पुणे- मुंबईकडे दररोज एकूण ७४ गाड्या जातात. दुसरीकडे जिल्ह्यातून सोलापूर- हैदराबाद, सोलापूर- पुणे, सोलापूर- धाराशिव, सोलापूर-सांगली (रत्नागिरी- नागपूर), सोलापूर- विजयपूर या महत्त्वाच्या महामार्गांची कनेक्टिव्हिटी देखील आहे. पुणे, मुंबई, बंगळूरच्या तुलनेत सोलापूर शहर-जिल्ह्यातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी जाणवत नाही.

 • -----------------------------------------------------------------

 • २) वंदे भारत एक्स्प्रेस सुरू, विमानसेवा लवकरच

 • सोलापूरच्या विमानतळासाठी येणारे अडथळे पूर्णपणे हटविण्यात आले असून सध्या विमानतळावरील रन-वे, ड्रेनेज, वॉल कंपाऊंडसह अन्य कामे पूर्णत्वाकडे आहेत. केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत सोलापूरचा समावेश असल्याने काही महिन्यात सोलापुरातून विमानसेवा देखील सुरू होईल. दुसरीकडे वंदे भारत एक्स्प्रेस सध्या सोलापुरातून सुरू झाली आहे.

 • ---------------------------------------------------------------

 • ३) पाणी, विजेची मुबलक उपलब्धता

 • जिल्ह्याच्या उशाला ११० टीएमसी साठवण क्षमता असलेले उजनी धरण आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच एमआयडीसींना धरणातूनच मुबलक पाणी मिळत आहे. एमआयडीसींमधील अंतर्गत रस्तेही चकाचक झाले आहेत. जिल्ह्यात कुंभारी, कासेगाव, गारवाड याठिकाणी नवीन एमआयडीसी होत आहेत. विजेचीही उपलब्धता सोलापूर जिल्ह्यात मुबलक आहे.

 • -----------------------------------------------------------------

 • ४) फाइव्ह स्टार हॉटेल

 • सोलापूर शहरात होटगी रोडवर फाइव्ह स्टार हॉटेल उभारण्यात आले आहे. शहरातील अन्य मोठमोठ्या हॉटेल्समध्येही दर्जेदार सुविधा आहेत. त्याठिकाणी जेवण, राहण्याची उत्तम सोय आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व हॉटेल्स आहेत.

 • ------------------------------------------------------------------------

 • ५) जिल्ह्यात दरवर्षी ५ हजार अभियंते

 • सोलापूर जिल्ह्यात सध्या १४ नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. त्यातून दरवर्षी पाच हजार अभियंते तयार होतात आणि त्यात आयटी पार्कसाठी लागणारे जवळपास एक हजार ते बाराशे अभियंते (आयटी व कॉम्प्युटर इंजिनिअर) आहेत. पुण्यासह अन्य आयटी पार्कमध्ये सोलापूर शहर-जिल्ह्यातील ६० हजारांहून अधिक अभियंते कार्यरत आहेत. त्यांच्यासह दरवर्षी मुबलक मनुष्यबळ सोलापुरात उपलब्ध होईल, अशी स्थिती आहे.

 • ----------------------------------------------------------------------------

 • ६) जागेची उपलब्धता अन्‌ सुरक्षेची हमी

 • चिंचोळी एमआयडीसीत स्वतंत्र पोलिस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून गृह मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे. उद्योजकांना त्याठिकाणी कोणताही त्रास होवू नये, यासाठी पोलिस यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहेत. दुसरीकडे चिंचोळीसह इतर एमआयडीसींमध्ये आयटी पार्कसाठी मुबलक जागा उपलब्ध होवू शकते, अशी स्थिती आहे.

सोलापूरमधील चिंचोळी एमआयडीसीत आयटी पार्कसाठी इमारत तयार

जिल्ह्यातील चिंचोळी एमआयडसींमध्ये आयटी पार्कसाठी इमारत तयार असून त्याठिकाणी कोणी प्रस्ताव दिल्यास तत्काळ कार्यवाही केली जाईल. जिल्ह्यात आयटी पार्कसाठी पोषक वातावरण असून मनुष्यबळ, जागा, पाणी, दळणवळण अशा सर्व सोयी-सुविधा सोलापूरमध्ये मुबलक आहे. त्यामुळे सोलापुरात आयटी पार्क उभारणीसाठी मोठी संधी आहे.

- वसुंधरा जाधव- बिर्जे, प्रादेशिक अधिकारी, सांगली, एमआयडीसी

सर्वांच्या प्रयत्नातून सोलापुरात निश्चितच होईल आयटी पार्क

सोलापूर जिल्ह्यात १४ नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालये असून तेथून दरवर्षी पाच हजार अभियंते तयार होतात. पण, काहींना नोकरी किंवा अपेक्षित जॉबसाठी स्थलांतर करावे लागते. पण, इथेच आपल्याकडे आयटी पार्क झाल्यास ते अभियंते सोलापुरातच राहून सोलापूरच्या प्रगतीला हातभार लावू शकतात. त्यासाठी सर्वांचा प्रयत्न जरुरी आहे.

- डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव

पुण्यात उद्योगांची दाटी, सोलापुरात मोठी संधी

पुण्यातील हिंजवडी, हडपसर अशा ठिकाणी आयटी पार्क उद्योगांची दाटी झाली आहे. आपल्याकडे दळणवळण साधने, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी, इन्फास्ट्रक्चर, पाणी, जागेची उपलब्धता आहे. सोलापूर जिल्ह्यात आयटी पार्कसाठी मोठ्या संधी आहेत. त्यासाठी सर्वांनी पाठपुरावा केल्यास निश्चितपणे तरुणांसाठी सोलापूर जिल्ह्यात आयटी पार्क होईल.

- डॉ. बी. पी. रोंगे, प्राचार्य, स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर

लोकप्रतिनिधींनी केंद्रात करावा पाठपुरावा, आयटी पार्कमुळे होईल सोलापूरचा विकास

केंद्रातील माहिती- तंत्रज्ञान मंत्रालयात पाठपुरावा करून सोलापूरसाठी आयटी पार्क आणावी, अशी लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा आहे. सोलापूर जिल्ह्यात अभियांत्रिकी महाविद्यालये असून त्याठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अभियंते तयार होतात. पुण्यातील आयटी पार्कमध्ये आपल्यातीलच तरुण-तरुणी खूप आहेत. त्यांचे स्थलांतर आयटी पार्क याठिकाणी झाल्यास थांबेल.

- विजय जाधव, सदस्य, सोलापूर विकास मंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com