
Uddhav Thackeray : अमित शहा पुण्यात असताना उद्धव ठाकरेंना जय शहाचा फोन, काय आहे प्रकरण?
Uddhav Thackeray : खेड येथील सभेला संबोधित करताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमावल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्रमक टीका केली. बाप चोरणारी टोळी असा उल्लेख त्यांनी एकनाथ शिंदे यांचा केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, "मी आधी सांगायचो मी बाळासाहेबांचा पुत्र आहे. तर हे लोक म्हणायचे किती वेळा सांगशील. मग आता ते का माझ्या वडिलांचा फोटो चोरत आहेत. अमित शहा पुण्याला येऊन गेले आणि मला जय शहा यांचा फोन आला. उद्धवजी तुम्ही कसे करणार मी खूप चिंतेत आहे. मी म्हटलं जयेश भाई काय झालं. तर जय शहा म्हणाले, तुमच्या वडिलांचा फोटो चोरला आता अमित शहा वडिलांसारखे असल्याचे ते (एकनाथ शिंदे) सांगत आहेत. ते माझी प्रॉपर्टी चोरतील की काय?. मी म्हटलं घाबरू नको त्यांना (एकनाथ शिंदे) सवय आहे आणखी यादीत नाव वाढतील."
"आज हा वडिलांसारखा उद्या तो वडिलांसारखा काही तरी लाज, शरम ठेवा. हे वैचारिक वांझोटेपणाचे लक्षण आहे. स्वत:मध्ये कतृत्वाची झलक नाही. दुसऱ्याच चोरायचं. भाजपसुद्धा हेच करतय, सरदार पटेल यांनी गुजरातमध्ये आरएसएसवर बंदी घातली होती ते पटेल त्यांनी चोरले. सुभाषबाबू देखील चोरले आता बाळासाहेब चोरत आहेत," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मेघालय विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने एनपीपीसोबत केलेल्या युतीवर उद्धव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
"अमित शहा यांनी कोनराड संगमा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, पण निकाल आल्यावर पंतप्रधान मोदींनी संगमा यांना पाठिंबा जाहीर केला. उद्धव यांनी टोमणा मारला की तुम्हाला लाज नाही?. पुण्यात अमित शहा म्हणाले मी मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटले. तुम्ही आता मेघालयात काय करत आहात? तुम्ही काय चाटलं?", असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.