राज्यातील कारागृहे बनली "मृत्यूचे सापळे'

दीपा कदम
बुधवार, 3 जुलै 2019

राज्यात तुरुंगात पाच वर्षांच्या काळात ४५ अनैसर्गिक मृत्यूच्या घटना घडल्या आहेत; पैकी ४० आत्महत्या आहेत. इतकेच नव्हे, तर शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचा बाहेरच्या जगाशी मोबाईलद्वारे सर्रास संपर्क सुरूच असल्याचेही उघड झाले आहे.

मुंबई -  कारागृहात होणाऱ्या आत्महत्या, कैद्यांकडे आढळून येणारे मोबाईल व गांजापर्यंतच्या अनेक गोष्टींनी राज्यातली कारागृहे चर्चेत असतात. ‘कॅग’च्या अहवालाने कारागृहांना पडलेल्या ‘भगदाडा’वरच प्रकाश टाकला आहे. राज्यात तुरुंगात पाच वर्षांच्या काळात ४५ अनैसर्गिक मृत्यूच्या घटना घडल्या आहेत; पैकी ४० आत्महत्या आहेत. इतकेच नव्हे, तर शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचा बाहेरच्या जगाशी मोबाईलद्वारे सर्रास संपर्क सुरूच असल्याचेही उघड झाले आहे.

मुख्य तीन कारागृहे मुंबई, नागपूर, नाशिक येथे पाच वर्षांत २५० पेक्षा अधिक मोबाईल आणि ३०० पेक्षा अधिक मोबाईल बॅटरी, असंख्य सिम कार्डपासून गांजासारख्या अमली पदार्थाची ४७ पाकिटे सापडली आहेत. गेल्या वर्षी भायखळा येथील महिलांच्या कारागृहात मंजुळा शेट्ये या महिला कैदीच्या झालेल्या मृत्यूनंतर कारागृहांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. राज्य सरकारने आज विधिमंडळात सादर केलेल्या कॅगच्या अहवालात कारागृहांभोवतालचे गूढ अधिकच दाट केले आहे. कारागृहांच्या व्यवस्थापनावरचा अहवाल कॅगच्या सामान्य आणि सामाजिक क्षेत्र अहवालात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात कारागृहातील २०१३ ते २०१८ या काळाचा आढावा घेण्यात आला आहे. वस्तू दक्षता प्रतिबंधक विभागाने अचानक केलेल्या पाहणीत कैद्याकडे अनेक प्रतिबंधित वस्तू आढळून आल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

कारागृहातील स्थिती
मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात ५ मोबाईल, २ सिम कार्ड आणि २१ हजार रुपये सापडले. तर, नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात १७१ मोबाईल, ३३ सिम कार्ड, २३५ मोबाईल बॅटरी, २ पेनड्राइव्ह, ४७ मोबाईल चार्जर, ४७ गांजाची पाकिटे तर नाशिक कारागृहात १०० मोबाईल, ६६ सिम कार्ड, १३२ मोबाईल बॅटरी, ४५ चार्जर, ५ इअरफोन, २२ घड्याळे, २ स्टील रॉड, २ शस्त्रे, २ चाकू आणि २ सुऱ्या सापडल्या आहेत.

आर्थर रोड तुरुंगाभोवती उत्तुंग इमारती
हाय प्रोफाईल कैदी, दहशतवादी, टोळी युद्ध गट आणि मादक द्रव्य बाळगणारे आदी कैद्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे मुंबईतील मध्यवर्ती कारागृह आणि सुधार केंद्र म्हणजेच आर्थर रोड जेल हे उच्च सुरक्षा कारागृह म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु या कारागृहापासून दीडशे मीटरच्या परिसरात उत्तुंग इमारती असून तेथून कारागृह थेट दृष्टिपथात पडते. इतकेच नव्हे, तर या कारागृहाच्या आतील दृष्य गुगल अर्थ या ॲप्लिकेशनवर उपलब्ध असल्याची नोंद करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही, बॅग स्कॅनर कार्यरत नाही
कैद्यांना न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन गेल्यानंतर परत येताना अनेकदा त्यांच्यासोबत प्रतिबंधित वस्तू येत असल्याचे निरीक्षण कॅगच्या अहवालात नोंदविण्यात आले आहे. कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, बॅग स्कॅनर कार्यरत नसल्याचेही दिसून आले आहे. कैद्यांच्या तपासणीसाठी बॉडीस्कॅनरची आवश्‍यकता मुंबई कारागृहाने तीन वर्षांपूर्वी नोंदवून देखील कारागृह महानिरीक्षकांकडून गृह विभागापर्यंत हा प्रस्ताव पोचला नसल्याची नोंद यामध्ये घेण्यात आली आहे.  

२०१३ ते २०१८
मधील कारागृहातील मृत्यू
४० आत्महत्या
५ मनुष्यवध


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jail in the State became death traps