esakal | भारत कधीच अफगाणिस्तान होऊ शकत नाही कारण... - जावेद अख्तर
sakal

बोलून बातमी शोधा

javed akhtar

भारत कधीच अफगाणिस्तान होऊ शकत नाही कारण... - जावेद अख्तर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

प्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी हिंदू हे जगात सर्वात सभ्य, सहिष्णु आहेत आणि भारत कधीच अफगाणिस्तान होऊ शकत नाही असं म्हटलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये लिहिलेल्या विशेष लेखात त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. याआधी जावेद अख्तर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीनंतर टीकेचा सामना करावा लागला होता. तेव्हा टीका करणाऱ्या प्रत्येकाला वैयक्तीक उत्तर देणं शक्य नसल्यानं हे जाहीर उत्तर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जावेद अख्तर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीनंतर सामनामधून अग्रलेखात त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यात जावेद अख्तर यांनी आरएसएस आणि विहिंपला तालिबानशी जोडणं हा हिंदू संस्कृतीचा अपमान असल्याचं म्हटलं होतं.

जावेद अख्तर यांनी लेखात म्हटलं की, मी अनेकदा म्हटलं आहे की भारत कधीच अफगाणिस्तान होऊ शकत नाही काऱण भारत हा कट्टरपंथी नाही. नेमस्त असणं आणि मध्यममार्गी भूमिका घेणं हे भारतीयांच्या डीएनएमध्ये आहे. हिंदू धर्माचा आणि हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप माझ्यावर केला त्यात कणभरही सत्य नाही.

जावेद अख्तर यांनी म्हटलं की, मी हिंदू धर्मातील कट्टर उजव्या विचारसरणीवर टीका करतान मुस्लिम धर्मांधाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप टीकाकारांनी केला. मला याचं आश्चर्य वाटत नाही कारण मी काय केलं याची माहिती त्या लोकांना नाही. मी काय करतो हे प्रत्येकाला माहिती असण्याचं कारण नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की, दोन दशकांमध्ये धर्मांध मुस्लिमांपासून जीवाला असलेल्या धोक्यामुळे मला दोनवेळा पोलिस संरक्षण देण्यातं आलं होतं. तिहेरी तलाकची चर्चाही नव्हती तेव्हा मी या मुद्द्याला जोरदार विरोध केला होता. अनेकदा सार्वजनिक व्यासपीठावरून मी विरोध दर्शवला होता. त्यानंतर मला धमक्या येऊ लागल्या.

हेही वाचा: आमिरच्या बॉडीगार्डचा पगार मुंबईतील 2 बीएचके इतका?

२०१० मध्ये टीव्ही चॅनेलवर एका प्रख्यात धर्मगुरुसोबत पडदा पद्धतीवर वादविवाद केला होता. त्यानंतर माझ्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले होते. तेव्हाही धमक्या आल्यानंतर पोलिसांनी संरक्षण पुरवलं. म्हणूनच मी मुस्लिम कट्टरतावद्यांविरोधात बोलत नाही हा आरोप निराधार असल्याचं जावेद अख्तर म्हणाले.

माजी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरही जावेद अख्तर यांनी भाष्य केलं आहे. जावेद अख्तर यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कट्टर विरोधकसुद्धा त्यांच्यावर कोणत्याही भेदभावाचा किंवा अन्यायाचा आरोप करू शकत नाहीत. मी त्या तीन पक्षांपैकी कोणत्याच पक्षाचा सदस्य नाही जे सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ते उत्तम प्रकारे सरकार चालवत आहेत. आज महाराष्ट्रात त्यांची लोकप्रियता ही बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडुत एम के स्टॅलिन यांच्याइतकी आहे असेही अख्तर यांनी लेखात म्हटले आहे. तसंच कोणी कसं आणि का उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तालिबानी म्हणू शकतं हे माझ्या समजण्यापलिकडे आहे असल्याचं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top