‘डीसीसी’च्या मतदार पात्रतेसाठी १ जुलै अंतिम तारीख! निवडणूक प्रक्रिया सुरू; विभागीय सहनिबंधकांनी मागवल्या याद्या, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची शक्यता

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने १ जुलै २०२६ ही अहर्ता (कट-ऑफ) तारीख निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत मतदार पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्यांनाच प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. या तारखेच्या आधारे प्राथमिक मतदार याद्या तयार करण्यात येणार असून, त्या बँकेकडून विभागीय सहनिबंधकांकडे सादर केल्या जाणार आहेत. त्यानंतर संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
solapur dcc bank

solapur dcc bank

solapur

Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने १ जुलै २०२६ ही अहर्ता (कट-ऑफ) तारीख निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत मतदार पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्यांनाच प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. या तारखेच्या आधारे प्राथमिक मतदार याद्या तयार करण्यात येणार असून, त्या बँकेकडून विभागीय सहनिबंधकांकडे सादर केल्या जाणार आहेत. त्यानंतर संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी अहर्ता तारीख निश्चित केल्याचे पत्र बँकेचे प्रशासक तथा सहकार विभागाचे पुणे विभागीय निबंधक यांना पाठविले आहे. या पत्रामुळे बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तत्कालीन अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळ २०१८ मध्ये बरखास्त करण्यात आले होते. संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घ्यावी, या मागणीसाठी बावची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतर्फे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान १ जुलै रोजी न्यायालयाने प्रशासकांवर गंभीर ताशेरे ओढले होते. तसेच, आठवड्याच्या आत निवडणुकीचे वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलै रोजी अपेक्षित होती. मात्र, त्या दिवशी सुनावणी झाली नाही. तत्पूर्वी, प्राधिकरणाने ६ जुलै रोजी पत्र काढून मतदार यादीसाठी अहर्ता तारीख निश्चित केली होती. न्यायालयाने ओढलेल्या ताशेऱ्यांनंतर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी अहर्ता तारीख निश्चित करण्याची विनंती ६ जुलै रोजी प्राधिकरणाकडे केली होती. त्यानुसार प्राधिकरणाने १ जुलै २०२६ ही अहर्ता तारीख निश्चित केली आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता

जिल्हा बँकेकडून मतदार याद्या सादर झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दावे व हरकती स्वीकारणे, त्यांवरील सुनावणी घेणे आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे, असा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. मतदार यादी अंतिम झाल्यानंतर संचालक मंडळाच्या निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर केला जाईल. ही प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संचालक मंडळाची प्रत्यक्ष निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com