अंदाजपंचे : दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित

गुरुवार, 9 मे 2019

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

दिंडोरीत अटीतटीचा सामना पण विजयाची माळ पडणार महालेंच्या गळ्यात
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकपच्या आव्हानाने चुरस वाढलेली दिसली. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीकडून शिवसेनेतून आलेल्या धनराज महालेंना तर राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवारांना भाजपने उमेदवारी दिली होती. उमेदवारांच्या अदल-बदलाने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे. अशाही स्थितीत आपापल्या शक्तिस्थळांच्या जोरावर चुरस वाढवण्यासाठी धडपडणाऱ्या या दोन उमेदवारांसमोर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आमदार जीवा पांडू गावितांच्या उमेदवारीने कडवे आव्हान उभे केलं आहे. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अटीतटीचा सामना झालेला पाहायला मिळाला. सोबत, खासदारकीची हॅट्ट्रिक करणारे हरिश्‍चंद्र चव्हाण यांची उमेदवारी भाजपने कापल्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसणार असल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच या जागेवर राष्ट्रवादीच्या धनराज महालेंचा विजय निश्चित आहे.

काँग्रेसला धुळ्यात संजीवनी पण, भामरे मारमार बाजी
संरक्षण राज्यमंत्रीच निवडणुकीच्या रिंगणात असल्याने "हायप्रोफाइल' ठरलेल्या लोकसभेच्या धुळे मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे. यात कॉंग्रेस आघाडीने "एकी'तून सत्ताधारी महायुतीला नमविण्यासाठी बळ वाढवले आहे. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आणि कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या अस्तित्वाच्या या लढाईत प्रतिष्ठा पणाला लावत मैदानात उतरले आहेत. भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी केलेली बंडखोरी कुणाल पाटील यांच्या पथ्यावर पडणार असे दिसत असून काँग्रेसला धुळ्यातून संजीवनी मिळणार आहे पण शेवटच्या टप्प्यात भामरे यांनी बाजी मारली आहे. यामुळे चुरशीची लढत असली तरी भामरेच विजयी होणार असे चित्र सध्या दिसत आहे.

नंदुरबारमध्ये के. सी पाडवी बाजी मारणार
नंदुरबार मतदारसंघातील लढत कॉंग्रेसचे ऍड. के. सी. पाडवी आणि भाजपच्या डॉ. हिना गावित यांच्यात असली तरी तिला अंतर्गत अनेक पदर आणि नाराजीची झालर आहे. त्यातच भाजपचे निष्ठावंत, संघ परिवाराचे विश्‍वासू डॉ. सुहास नटावदकर यांनी अपक्ष म्हणून उडी घेतल्याने भाजपला फटका बसणार आहे. हीना गावित यांनी नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी मांडत कॉंग्रेससमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण कॉंग्रेसने एकमताने उमेदवारी निश्‍चित करीत ऍड. के. सी. पाडवी यांचे काम केल्याने काँग्रेसचे पारडे जड असल्याने के. सी. पाडवी यांचा विजय निश्चित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: K C Padvi, Subhash Bhamare And Dhanraj Mahale Likely To Win Loksabha 2019