राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेस,भाजप, राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढतीचे संकेत : Sangli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar Panchayat Election

राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेस,भाजप, राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढतीचे संकेत

कडेगाव : नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला असून कडेगाव (Kadegaon) नगरपंचायतीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीमध्ये (Congress,BJP,NCP)तिरंगी सामना होण्याचे संकेत मिळत असून आतापासूनच आरोप प्रत्यारोपाना सुरुवात झाली आहे.

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यापासून इच्छुकांनी आपआपल्या नेत्याकडे उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी, शिवसेना आदी राजकीय पक्षांनी प्रभागवार उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

हेही वाचा: घाटमाथ्यावर वातावरण तापलं; 'सात' गावांत निवडणुकीचे धूमशान

नगरपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर भाजप हा विरोधी पक्ष आहे. त्यामुळे येथे काँग्रेस आपली सत्ता कायम राखण्यासाठी तर भाजप व राष्ट्रवादी सत्तेपर्यंत कसे जाता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे शहरांत सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तर निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताच शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

सध्या कडेगाव नगरपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर शिवसेना व अन्य पक्ष किती जागा लढवणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे नेते व राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी नगरपंचायतीची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तसेच कडेगावच्या विकासासाठी सुमारे सहा कोटींचा निधी त्यानी खेचून आणला आहे. तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटनांचा धडाका लावला आहे.तसेच शहरातील विविध समारंभांना हजेरी लावत जनसंपर्कही वाढवला आहे.

भाजपचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनीही नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आपला संपर्क वाढवला आहे. तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संग्रामसिंह देशमुख यांनी एकहाती विजय मिळविल्यामुळे येथील भाजपचे कार्यकर्ते चांगलेच रिचार्ज झाले आहेत. त्यामुळे भाजपला येथे आलेली मरगळ आता झटकून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यामुळे आता निवडणूक मैदानात चांगलीच रंगत येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

काँग्रेस, भाजपबरोबरच राष्ट्रवादीनेही आपले दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते व आमदार अरुण लाड व जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड यांनी नगरपंचायतीची निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. तसेच इतर पक्षातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत पक्षाची बांधणीही सुरू केलेली आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादीने नगरपंचायत निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. नगरपंचायतच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला कितपत यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अशा रीतीने नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने शहरांत राजकिय हालचालींना वेग आला आहे. तर पहिल्यांदाच ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता असल्याने यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.

loading image
go to top