esakal | मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार 
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार 

मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड - मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करून देणार नाही, असा इशारा देऊन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व सुकाणू समिती सदस्य संजय पाटील-घाटणेकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी ता. नऊ ते 23 जुलै दरम्यान राज्यभर संघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याचेही जाहीर केले. 

बळिराजा शेतकरी संघटनेची राज्यस्तरीय बैठक आज येथे झाली. त्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सवंग लोकप्रियता मिळवून बॅंकांची कर्जवसुली करण्यासाठीच राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखविले आहे. सरकारने कर्जमाफी देताना पश्‍चिम महाराष्ट्रावर जाचक अटी घातल्या. त्यामुळे सरकारची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्‍त करून त्यांचा सातबारा कोरा करावा, यासह अन्य मागण्यांसाठी बळिराजा शेतकरी संघटनेने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला. 

श्री. घाटणेकर म्हणाले, ""शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या पांडुरंगाच्या वारीत सध्या शेतकरी व्यस्त आहेत. आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला येण्याची प्रथा आहे. मात्र, या वेळी तीन जुलैला मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला येऊ नये. रांगेमध्ये असलेल्या शेतकरी दांपत्याच्या हस्ते महापूजा करावी, अशी आमची मागणी आहे. त्यातूनही मुख्यमंत्र्यांनी पोलिसी बळाचा वापर करून पंढरपूरला येण्याचा प्रयत्न केल्यास तो आम्ही उधळून लावू. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या पांडुरंगाची पूजा करू दिली जाणार नाही. सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पीककर्ज व शेती पूरक इतर सर्व कर्ज सरसकट माफ करावे, यासाठी बळिराजा शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन करेल. मुंबई येथे पार पडलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत कर्जमाफी मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले आहे.'' 

या वेळी बळिराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष भीमाशंकर बिरासदार, प्रदेश युवा अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. 

संघर्ष यात्रेसाठी तयार व्हा 
किसान क्रांती मोर्चा, शेतकरी संघटना आणि सुकाणू समितीतर्फे 9 जुलैपासून 23 जुलैपर्यंत संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत जिल्हावार मेळावे घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. या यात्रेला नाशिक येथून प्रारंभ होणार असून, पुणे येथे समारोप होईल. त्यानंतर 26 जुलै रोजी मुंबई येथे बैठक घेऊन पुढील दिशा ठरविली जाईल, असेही श्री. घाटणेकर यांनी स्पष्ट केले. 

loading image
go to top