
वर्ष 2017. सातार्यातली एक सर्वसाधारण कुटुंबातून आलेली पण अतिशय हुशार आणि आत्मविश्वासाने भरलेली मुलगी कश्मीरा संदीप पवार. सातार्यात चर्चा रंगली होती की आपल्या गावातूनच एक महिला थेट पंतप्रधान कार्यालयात पोहोचली आहे. सर्वत्र कौतुक सुरू झालं.
बातम्यांमध्ये देखील छापून आलं – "एमपीएससी" परीक्षा पास करून मिळालेल्या उपजिल्हाधिकारी पदाला तिने नकार दिला, CBI चं अधीक्षक पद नाकारलं, कारण तिची निवड थेट PMO मध्ये झाली होती! इतकंच नाही, तर तिच्या नावाने पत्रं पाठवताना केंद्र सरकार 'कश्मीरा पवार, महाराष्ट्र' इतकाच पत्ता वापरत होतं – एवढी ती "महत्वाची" झाली होती.
तिने ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पात प्रथम क्रमांक मिळवला, ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना तिने तयार केली, तिच्या 'सोशल असिस्टंट प्रोग्रॅम'ला पेटंट मिळालं अशा अफवा सगळीकडे पसरल्या होत्या. इतकंच काय तर "डोकलाम वादावर ती बोलली, आणि सुषमा स्वराज यांनी संसदेत तिच्या भाषणावर आधारित उत्तर दिलं", अशी कहाणीसुद्धा सांगितली गेली.
NSA अजित डोभाल आणि पंतप्रधान मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉलवर चर्चा करत असल्याचे दावेही करण्यात आले.लोक भारावून गेले. अनेकांनी तिच्या 'पदाचा' आदर करत, तिच्यावर विश्वास ठेवला. काहींनी आपले व्यवसाय, नोकरी किंवा राजकीय स्वप्ने तिच्या हातात सोपवली. आणि इथेच सुरू झाला एका मोठ्या फसवणुकीचा खेळ.
कश्मीराचा साथीदार गणेश गायकवाड – वय 32 – दोघांनी मिळून लोकांना अशा आश्वासनांचं आमिष दाखवलं की सरकारी नोकरी मिळवून देतो, पीएमओशी कनेक्शन लावतो, योजना मंजूर करून देतो. लोकांनी विश्वास ठेवून पैसे दिले – एक-दोन नाही तर तब्बल 82 लाख रुपये.
मात्र, एक दिवस सत्य बाहेर आलं. पोलिसांकडे तक्रारी गेल्या. सातारा पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि अखेर कश्मीरा आणि गणेश दोघांनाही अटक केली. त्यांच्यावर फसवणूक, बनावट कागदपत्रं तयार करणं आणि खोटं भासवणं यासारख्या गंभीर गुन्ह्यांत गुन्हा नोंदवला गेला.
पोलीस म्हणाले, "आतापर्यंत तिघा तक्रारदारांकडून आम्हाला माहिती मिळाली आहे, ज्यांची एकूण फसवणूक 82 लाख रुपये इतकी आहे. अजून बळी पुढे येण्याची शक्यता आहे."
कश्मिरा पवारचा किस्सा केवळ एका व्यक्तीच्या फसवणुकीचा नाही, तर टेक्नॉलॉजीचा वापर करून विश्वास संपादन करणाऱ्या आधुनिक 'महाठगां'चा आरसा आहे. कधी कधी फसवणूक करणारे चेहरे आणि त्यांच्या कहाण्या खोट्या पण इतक्या खात्रीशीर वाटतात, की सामान्य माणूस सहज गोंधळून जातो. आणि म्हणूनच, कितीही मोठा दावा कोणी केला, तरी त्यामागे तथ्य आहे का हे तपासणं फार गरजेचं असतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.