
सत्तेसाठी किती खालच्या थराला जाल? आनंद दिघेंच्या पुतण्याचा शिंदेंना सवाल
मुंबई - शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील टीका टीप्पणी शिंगेला पोहोचली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटाला गद्दार संबोधल जात असून त्याला शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंसोबत झालेल्या राजकारणाचा गर्भित इशारा देत भूकंप घडवण्याचा इशारा दिला. त्याला आता दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Kedar Dighe criticizes Eknath Shinde)
हेही वाचा: एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाचे अध्यक्ष होणार का? रामदास कदम म्हणतात...
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलं की, सत्तेसाठी विश्वासघात कुणी केला? शिवाय धर्मवीर सिनेमा केवळ ट्रेलर होतं. आनंद दिघेंसोबत काय राजकारण झालं याचा लवकरच खुलासा करेन. मात्र मी मुलाखत दिली तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, असा गर्भीत इशाराही शिंदे यांनी दिला होता.
यावरून केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे. आनंद दिघे यांची सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली, अशा शब्दात केंदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. आनंद दिघे यांच्यासोबत राजकारण झालं होतं, तर मग तुम्ही २५ वर्षे गप्प का बसलात, सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल? असा सवालही केदार यांनी उपस्थित केला.
वास्तविक पाहता, आनंद दिघे यांचं निधन हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झालं आहे. त्यावेळी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्याच हातात होती. तर उद्धव ठाकरे हे २००३ मध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी विराजमान झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे कुणाविषयी खुलासा करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच दिघे यांच्यासोबत राजकारण कोणी केलं, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
Web Title: Kedar Dighe Criticizes Eknath Shinde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..