
राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व पालिका आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना इन्फ्लुएंझासारखा आजार व गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (सारी) चे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यभरातील सारी रुग्णांवर लक्ष ठेवा!
मुंबई - युरोप आणि आग्नेय आशियाच्या काही भागांमध्ये पुन्हा वाढत्या कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व पालिका आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना इन्फ्लुएंझासारखा आजार व गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (सारी) (Sari) चे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून राज्यातील कोविड रुग्णांची (Covid Patients) संख्या नियंत्रित राहील. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारीसह रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची पुन्हा कोविडची चाचणी केली जाईल. पॉझिटिव्ह नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, की दोन महिन्यांत दररोज रुग्णांमध्ये घट झाली असली तरी कोविडविरोधात कसलाच हलगर्जीपणा चालणार नाही. सर्व अधिष्ठात्यांनाही त्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. वैद्यकीय अधीक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे सुरू ठेवावे. कोरोनासदृश लक्षणे दिसल्यास प्रत्येक रुग्णाचे निरीक्षण करावे आणि त्वरित आरटीपीसीआर चाचणी करावी. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी जिल्ह्यांना गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. योग्य मास्किंग आणि तीव्र श्वसन संक्रमण व इन्फ्लुएंझासारख्या आजारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात जारी केलेल्या पत्रात त्यांनी जिल्ह्यांना लसीकरण वाढवण्याच्याही सूचना केल्या आहेत.
पुढील सहा महिने सर्व त्रिसूत्री पाळावी
आम्ही सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांना इन्फ्लुएंझासदृश आजार व गंभीर तीव्र श्वसन आजार असलेल्या रुग्णांची काळजी घेण्याच्या तसेच आरटीपीसीआर चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. इतर देशांतील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सर्वच पर्यायांचा विचार होईल. पुढील सहा महिने सर्व त्रिसूत्री पाळावी, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.
Web Title: Keep On Watch All The Patients Across The Maharashtra State
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..