Motivational: केरळच्या शिवभक्ताची सायकलवरून दुर्गभ्रमंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Motivational Hamras MK

केरळच्या तरुणाला युट्यूबवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची एक चित्रफीत पाहताना त्यांच्या कर्तृत्त्वाबद्दल कुतूहल निर्माण झाले.

Motivational : केरळच्या शिवभक्ताची सायकलवरून दुर्गभ्रमंती

पुणे - केरळच्या तरुणाला युट्यूबवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची एक चित्रफीत पाहताना त्यांच्या कर्तृत्त्वाबद्दल कुतूहल निर्माण झाले.

महाराजांच्या ३७० किल्ल्यांविषयी समजताच तो चकित झाला आणि त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी चक्क सायकलवरून या सगळ्या किल्ल्यांना भेट देण्यासाठी निघाला. या अवलिया तरुणाचे नाव आहे हमरास एम. के.

गतवर्षी मे महिन्यात सुरू केलेल्या या मोहिमेत त्याने आत्तापर्यंत सात हजार किलोमीटरचा प्रवास केला असून ११० किल्ल्यांना भेट दिली आहे. येत्या दीड वर्षांत ही मोहिम पूर्ण करण्याचा त्याचा मानस आहे.

हमरास सध्या २६ वर्षांचा असून तो केरळच्या कलिकट जिल्ह्यातील कोत्तापूरम गावाचा रहिवासी आहे. वाणिज्य विषयातील पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने सौदी अरेबियामध्ये वाहन चालक म्हणून काही काळ काम केले.

मात्र लहानपणापासून भ्रमंतीची आवड असल्याने त्याने सायकलवारीचा निर्णय घेतला. ‘या सायकल प्रवासाला निघताना माझे वजन सुमारे १२० किलो होते, आता ते ९० किलो झाले. हा एक महत्त्वाचा फायदा आहे’, असे हमरास गंमतीने सांगतो.

रायगडावर करणार समारोप

हमरास याने दुर्गभ्रमंतीची सुरूवात प्रतापगडापासून केली, तर या भ्रमंतीचा समारोप तो स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर करणार आहे.

आत्तापर्यंत त्याने राजगड, तोरणा, रोहिडेश्वर, सुभान मंगल, सुधागड, सारसगड आदी किल्ल्यांना भेट दिली आहे.

सुरुवातीला किल्ल्यांच्या स्थळांविषयी फारशी माहिती नसल्याने कशीही भ्रमंती करत होतो. त्यात अनेकदा फेराही पडला, मात्र या भ्रमंती दरम्यान ओळख झालेल्या शिवप्रेमींनी मदत करून योग्य वाट आखून दिली आहे, असे हमरास याने सांगितले.

‘मराठी माणसांच्या आदरातिथ्याने भारावलो’

भ्रमंतीला निघताना राहण्यासाठी तंबू आणि किरकोळ स्वयंपाकासाठी आवश्यक भांडी, असा ऐवज सोबत घेतला होता.

मात्र आता ती भांडी मागे ठेवली आहेत, कारण प्रत्येक गावात अतिशय प्रेमाने आणि हक्काने माझ्या जेवणाची सोय केली जाते, असा अनुभव हमरास सांगतो.

लोणावळा येथील एका किल्ल्याची सफर करताना घनदाट जंगलात वाट हरवली होती. पण स्थानिकांनी तात्काळ मदत करत सुखरूप बाहेर काढले, असे त्याने सांगितले.

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा ठेवा वैभवशाली आहे. मात्र, अनेक किल्ल्यांवर कचरा दिसून आला. काहींची दुर्दशा झाली आहे. हे किल्ले म्हणजे महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असून त्यांची योग्य निगा राखली जावी.

- हमरास एम. के.