
तात्या लांडगे
सोलापूर : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सोलापूर शहरातील शाळेत आलेल्या इयत्ता आठवीतील मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कराड येथून ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी २४ तासांत त्या मुलीसह तरुणाला शोधले. सिद्राम बुक्का (रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय कुंभारी येथे रहायला असताना संशयित आरोपी सिद्राम याची त्या मुलीशी ओळख झाली होती. काही महिन्यांपूर्वी मुलीचे कुटुंबीय हत्तूर येथे राहायला गेले होते. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी शाळेतील स्वांतत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी ती मुलगी सकाळी साडेसहा वाजता घरातून बाहेर पडली होती. ११.३० वाजल्यानंतरही मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने इतरत्र शोध घेतला, मैत्रिणींकडे विचारपूस केली, परंतु मुलगी सापडली नाही. त्यानंतर मुलीच्या आईने फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी शाळा ते सोलापूर एसटी स्टॅण्ड या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळले. त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून अल्पवयीन मुलीला मोहोळच्या दिशेने घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी पाठलाग केला आणि मोहोळ बस स्टॅण्डवर चौकशी केली.
दुचाकी मोहोळमध्ये लावून तो तरुण एसटीने कराडला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक कराडच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांनी कराड येथून दोघांनाही सोलापुरात आणले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत, पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक सतीश बावणे यांच्या नेतृत्वातील पोलिस अंमलदार अयाज बागलकोटे, अमोल खरटमल, सूरज सोनवलकर, अमोल पवार यांच्या पथकाने पार पाडली.
सिद्रामच्या भावजीचा क्रमांक घेतला अन्...
संशयित आरोपी सिद्राम बुक्का याची बहीण कराड येथे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. कराडला जाताना वाटेतच पोलिसांनी सिद्रामच्या भावजीचा क्रमांक मिळविला. त्यानंतर सायबर पोलिसांच्या माध्यमातून त्या क्रमांकाचे लोकेशन शोधले आणि पोलिस त्याठिकाणी पोचले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी त्यांच्या घरी दिसली. पण, सिद्राम बाहेर गेला होता. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आणि सिद्राम यायची वाट पाहिली. तत्पूर्वी, घरातील सर्वांचे मोबाईल पोलिसांनी काढून घेतले होते. काहीवेळाने सिद्राम बहिणीच्या घरी आला आणि पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन सोलापूरची वाट धरली. सिद्रामविरुद्ध अपहरणासह ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.