KDCC Result : संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, रणवीर, सुधीर देसाई यांची विजयी सलामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KDCC Result : संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, रणवीर, सुधीर देसाई यांची विजयी सलामी

KDCC Result : संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, रणवीर, सुधीर देसाई यांची विजयी सलामी

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विकास संस्था गटात गडहिंग्लज तालुक्यातून विद्यमान संचालक संतोष पाटील, भुदरगडमधून विद्ममान संचालक व माजी आमदार के. पी. पाटील यांचे पुत्र रणजितसिंह पाटील, आजरातून सुधीर देसाई, शाहुवाडीतून रणवीरसिंह गायकवाड या सत्तारूढ गटाचे चार उमेदवार विजयी झाले. शाहुवाडीतून विद्ममान संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर तर आजऱ्यातून विद्यमान संचालक अशोक चराटी यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

जिल्हा बँकेची मतमोजणी आज महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सकाळी आठ वाजता सुरू झाली. सुरूवातील ४० मतदान केंद्रावरील विकास संस्थ गटासह इतर गटातील मतपत्रिकांचे वर्गीकरण करून विकास संस्था वगळता इतर गटातील मतपत्रिका एकत्रीत करण्यात आल्या. त्यानंतर दहा वाजता प्रत्यक्ष विकास संस्था गटातील मतमोजणीला सुरूवात झाली.

भुदरगड विकास संस्था गटात रणजित पाटील यांना १४४ तर त्यांचे विरोधक यशवंत नांदेकर यांना ६२ मते मिळाली. शाहुवाडी विकास संस्था गटात रणवीर गायकवाड यांना ६६ तर संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांना ३२ मते मिळाली. गडहिंग्लज विकास संस्था गटात १०६ पैकी तब्बल १०० मते घेऊन संचालक संतोष पाटील यांनी सलग दुसऱ्यांना या तालुक्यातून जिल्हा बँकेत प्रवेश केला.

यातील सुधीर देसाई, रणवीर गायकवाड हे पहिल्यांदाच बँकेत आले आहेत. श्री. देसाई यांचे वडील दिवंगत राजाराम देसाई यांनी बँकेचे अध्यक्ष पद भूषवले होते.