पोलिस दलाच्या गैरवापराची चौकशी व्हावी - पवार 

पोलिस दलाच्या गैरवापराची चौकशी व्हावी - पवार 

मुंबई  - ‘‘कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषदेचा तपास ‘एनआयए’कडे दिला तो केंद्राचा अधिकार आहे. परंतु कोरेगाव भीमा किंवा एल्गार याची चौकशी व्हावी, ही आमची मागणी नाही, तर पोलिस दलाचा ज्यापद्धतीने गैरवापर झाला आहे, त्याची चौकशी व्हायला हवी,’’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आज शरद पवार यांनी तत्कालीन भाजप सरकारवर चौफेर टोलेबाजी केली. 

पवार म्हणाले, ‘‘या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार राज्य सरकारलाही आहे. यामध्ये पुणे पोलिसांनी जो तपास केला. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलाच्या लौकिकाला धक्का बसला आहे. त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या महाराष्ट्र पोलिस आणि पुणे पोलिसांची चौकशी करण्यात यावी.’’ 

भिडे व एकबोटे यांची भूमिका संशयास्पद ... 
कोरेगाव भीमा, एल्गार परिषदेची चर्चा राज्यात सध्या जोरदार सुरू आहे. कोरेगाव भीमा हा वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षे एका ठिकाणी लोक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. या स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाऊन आले आहेत. त्या काळात जे युद्द झाले. त्या वेळी पेशव्यांचा पराभव झाला होता. ब्रिटिशांच्या बाजूने काही घटक होते हे यावरून स्पष्ट होते. इथले स्थानिक ग्रामस्थ इथे येणाऱ्या लोकांना पाण्याची व्यवस्था करत होते. त्या वेळी कोणतीही कटुता नव्हती. मात्र आजूबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे, एकबोटे यांनी फिरून वेगळे वातावरण निर्माण केल्याचे पवार यांनी स्पष्ट सांगितले. आता चौकशी सुरू आहे, त्यामुळे वस्तुस्थिती समोर येईल त्यावर आज भाष्य करता येणार नाही. 

... संबध नसलेल्यांवर खटले ... 
‘‘कोरेगाव आणि एल्गारचा संबंध नव्हता. पुरोगामी विचाराच्या लोकांनी सहभागी होत ही एल्गार परिषद घेतली होती. पी. बी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद होणार होती; परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आले नाहीत. त्या परिषदेत भाषणे झाली. पोलिस रिपोर्ट सादर केला गेला. त्यात सगळे सांगितले आहे. आज प्रश्न निर्माण झाला आहे तो त्याच्याशी संबंध नसलेल्या लोकांचा आहे. त्याठिकाणी हजर नसलेल्यांवर खटले भरण्यात आले आहेत. सुधीर ढवळे यांनी कविता वाचन केले म्हणून त्यांना अटक केली. नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे वाचन केले होते. त्या कवितेत राज्यातील शहरात गावात उपेक्षित वर्गावर झालेले अत्याचार यावर तीव्र भावना व्यक्त केली होती,’’ याचा दाखलादेखील पवार यांनी दिला. 

शेवटी त्या कवितेत या शहरा शहराला आग लावत जा, असा सारांश होता. नामदेव ढसाळ यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे या कवितेचा आधार घेऊन दोन - दोन वर्ष तुरुंगात टाकायचे ही गोष्ट योग्य नाही. यांच्यावरील अन्याय कसा दूर करता येईल, न्यायालयात काय होतेय हे पाहणे आवश्‍यक आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांना जामीन मिळाला नाही. जी माहिती राज्याने ठेवली. पुरावे असे तयार केले की जामीन त्यांना मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दाखल्याचे वाचन शरद पवारांनी या वेळी केले. चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे आणि आमचीही तीच मागणी आहे. त्यासाठी एसआयटी नेमा. चांगले अधिकारी घ्यावेत. जे काही पुरावे देण्यात आले, त्यातील सत्य बाहेर येईल, असेही पवार म्हणाले. 

ते साहित्यिक देशद्रोही नाही 
‘‘या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, साहित्यिकांना डांबले आहे. त्यांचे कार्य आक्रमक आहे म्हणून मी देशद्रोही म्हणणार नाही,’’ असे शरद पवार म्हणाले. 
एल्गार परिषद झाल्यावर शपथ घेण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्राम धाम पुणे यांनी रिपोर्ट दिला आहे. जी शपथ घेण्यात आली त्या शपथेचे वाचन शरद पवारांनी या वेळी केले. या शपथेमध्ये संविधानाचा उल्लेख आहे, असे असताना तुरुंगात डांबले आहे. जे उपस्थित नव्हते त्यांनाही डांबले आहे. सत्तेचा कसा गैरवापर केला हे स्पष्ट होत आहे. काय तपास करायचा तो राज्य सरकार करेल मी त्यात पडणार नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

पोलिस दलाची अवस्था आज काय आहे. मात्र सत्तेचा गैरवापर पोलिसांना वापरून होतो ही चिंताजनक बाब आहे. म्हणून मी हे प्रकरण मांडत आहे, असेही पवार म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com