मुंबई - ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या एकवीसशे रुपयांच्या लाभाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतील. मात्र सध्या या लाभार्थी महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ देण्यात येत असून, या योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज ५० रुपये प्रमाणे सुमारे ३१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे,’ असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. मात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन देऊन त्याची पूर्तता नाकारणाऱ्या सरकारचा निषेध करीत विरोधकांनी सभात्याग केला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत १८ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला असतानाही अनेक अपात्र महिलांना या अनुदानाचे वाटप करण्यात आले. तसेच अन्य योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही या योजनेअंतर्गत लाभ दिला असल्याचा मुद्दा आमदार रोहित पवार आणि अन्य आमदारांनी उपस्थित केला होता.
‘या योजनेअंतर्गत अनुदान प्रलंबित आहे. तसेच अर्ज भरण्यात महिलांना अडचणी येत असल्याने अनेक महिलांना यापासून वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला. मात्र अशा प्रकारे कोणाचेही अनुदान प्रलंबित नसल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. फेब्रुवारी अखेरपर्यंत दोन कोटी ४७ लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. हे पैसे त्यांना कधी देणार, असा प्रश्न वरुण सरदेसाई यांनी केला. याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार असल्याचे उत्तर तटकरे यांनी देताच विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरवात केली. त्याबरोबर सर्वच सदस्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला.
पोषण आहारात मृत उंदीर
रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायतीच्या अंगणवाडीमध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळल्या प्रकरणी स्वतंत्र समिती नेमून चौकशी करण्यात येईल. तसेच प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तसेच पुरवठादार या घटनेस जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे तटकरे यांनी सांगितले. वडखळ येथील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये बालकांसाठीच्या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये मृत उंदीर सापडले, असल्याचा मुद्दा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी केला होता.
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा
स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. राज्यात अवैध गर्भपात रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सदस्य श्वेता महाले यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
आमदार रोहित पवार व रणधीर सावरकर यांनी यावेळी चर्चेत भाग दिल्या. आबिटकर म्हणाले, ‘राज्यात मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत. स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गुन्ह्यांवर ‘पीसिपीएनडीटी कायद्याद्वारे कठोर कारवाई केली जात आहे.
पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्या प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय असून स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी त्या कार्य करीत आहेत.’
‘१०४’वर द्या स्त्रीभ्रूणहत्येची माहिती
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी बनावट (डिकॉय) प्रकरणामधील महिलेला एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अवैधरीत्या होत असल्या स्त्रीभ्रूणहत्येची माहिती देण्यासाठी १०४ हा क्रमांक कार्यरत असून तो अधिक सक्षम केला जाईल, असे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.