भारतीय राष्ट्रध्वजाला ‘अशी’ मिळाली होती मान्यता

सुस्मिता वडतिले
Wednesday, 22 July 2020

भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय नागरिकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्याला राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचा प्रतीक आहे.

पुणे : भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय नागरिकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्याला राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचा प्रतीक आहे. भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्चला इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. २२ जुलै १९४७ राजी या ठरावाला मंजुरी देण्यात आली.

कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व, वेगळेपण, अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारं प्रतीक असतं. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी २२ जुलै १९४७ रोजी घटनासभेच्या बैठकीत तिरंग्याचा स्वीकार राष्ट्रीय ध्वज म्हणून करण्यात आला.

डॉ. एस. राधाकृष्णन यांनी संविधान सभेत राष्ट्रध्वजामधील रंगाच्या व चक्राच्या अर्थसूचकतेबद्दल माहिती दिली. भगवा किंवा केशरी हा रंग स्वार्थ, निरपेक्ष त्यागाचा दर्शक आहे. आपल्या नेत्यांनी देखील भौतिक लाभापासून तटस्थ राहिले पाहिजे. आपल्या कामामध्ये स्वतः ला वाहून घेतले पाहिजे. मध्यभागी असलेला पांढरा रंग प्रकाशाचा, आपल्या आचरणात मार्गदर्शन करणाऱ्या सत्याचा मार्ग आहे. हिरवा रंग हा आपले मातीशी असलेले नाते व त्यावर इतर सर्वांचे जीवन अवलंबून आहे, अशा वनस्पती, जीवनाशी असलेले आपले नाते दर्शवितो. पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र हे धर्म, नियमाचे चक्र आहे. जे या ध्वजाखाली काम करतात त्यांची सत्य, धर्म किंवा सदाचार ही नियंत्रक तत्वे असली पाहिजेत. तसेच चक्र हे गतीचे दर्शक आहे. भारताने परिवर्तनाला कसलाही विरोध करू नये. त्याने गतिमान बनले पाहिजे, असे वर्णन डॉ. एस. राधाकृष्णन यांनी केले होते.

असा आहे राष्ट्रध्वज
राष्ट्रध्वज तीन रंगांच्या पट्ट्याचा असून तो समान रुंदीच्या तीन आयताकृती पट्ट्या किंवा जोड पट्ट्या यांचा मिळून बनलेला असेल. सर्वात वरची पट्टी भारतीय केशरी रंगाची असेल तर खालची पट्टी भारतीय हिरव्या रंगाची असेल. मधली पट्टी पांढऱ्या रंगाची असेल. तिच्या मध्यभागी समान अंतराच्या 24 आर्यांचे नेव्ही ब्ल्यू रंगाचे अशोक चक्र चिन्ह असेल. अशोक चक्र हे विशेषकरून स्क्रिन प्रिंटीग केलेले किंवा अन्य प्रकारे प्रिंट केलेले किंवा स्टेन्सिल केलेले अथवा योग्य रीतीने भरतकाम केलेले असेल.  ते त्याच्या दोन्ही बाजूने पांढऱ्या मध्यभागी पुर्ण दिसेल असे असते.

भारतीय तिरंगाचा इतिहास... 
प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राचा स्वतःचा ध्वज असतो. हे स्वतंत्र देश होण्याचे चिन्ह आहे. २२ जुलै १९४७ रोजी झालेल्या भारतीय संविधान सभाच्या बैठकीत भारतीय राष्ट्रीय ध्वज सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीशांकडून भारताच्या स्वातंत्र्याच्या काही दिवस आधी करण्यात आले होते. १५ ऑगस्ट १९४७ आणि २६ जानेवारी १९५० ला भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. त्यामुळे भारतातील "तिरंगा" हे भारतीय राष्ट्रीय ध्वज आहे.

अशोक चक्र... 
या धर्मचक्रांना कायद्याचे चाक म्हटले जाते. जे मौर्य सम्राट अशोकाने इ.स.पू. ३ शतकात बनविलेले सारनाथ मंदिरातून हे काढले होते. हे चक्र दर्शविण्याचा अर्थ आहे की जीवन सुरु आहे आणि थांबणे म्हणजे मृत्यू.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Learn history of recognition of the Indian National Flag on 22 July 1947