विधान परिषदेसाठी 'या' दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सतेज पाटील करणार उमेदवारी अर्ज दाखल : Satej Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satej Patil

'या' दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सतेज पाटील करणार उमेदवारी अर्ज दाखल

कोल्‍हापूर : विधानपरिषद निवडणुकीसाठी (Legislative Council Election 2021) महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील(Satej Patil) हे गुरुवारी (ता.१८) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्‍थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच जिल्‍हा परिषद सदस्य व पंचायत समितीच्या सभापतींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक धैर्यप्रसाद हॉल येथे साडे अकरा वाजता होणार असून आघाडीचे सर्व नेते यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवार पासून सुरुवात झाली. मात्र आत्तापर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील यांची उमेदवारी निश्‍चित आहे. तर भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांच्या उमेदवारीवर शिक्‍का मोर्तब करण्यात आला असून नावाच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. पालकमंत्री पाटील यांनी यापुर्वीच गुरुवारी (ता.१८) अर्ज दाखल करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी ११ वाजता मंत्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज जिल्‍हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला जाणार आहे.

मंत्री पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे बहुतांश नेते उपस्‍थित राहणार आहेत. यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्‍हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील, खासदार प्रा.संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार पी.एन.पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार राजूबाबा आवळे, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे नेते, संस्‍थांचे पदाधिकारी उपस्‍थित राहणार आहेत.

दिवसभर अर्ज भरण्याची प्रक्रिया

पालकमंत्री सतेज पाटील हे गुरुवारी (ता.१८) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्‍पुर्वी अर्ज भरण्याची तांत्रीक प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम बुधवारी दिवसभर सुरु होते. अनुमोदक, सुचक म्‍हणून जिल्‍हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या विविध सदस्यांनी सह्या केल्या. तसेच विविध कागदपत्रांची पूर्तताही दिवसभर करण्यात आली. त्यामुळे जिल्‍हा परिषदेतही दिवसभर सत्ताधारी सदस्यांचा वावर राहिला.