लढत ठरली! सतेज पाटील विरुध्द शौमिका महाडिकच ; भाजपची उद्या घोषणा : Satej Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शौमिका महाडिक, सतेज पाटील

माजी आमदार महादेवराव महाडिक यांची शिरोलीत जाऊन चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली.

लढत ठरली! सतेज पाटील विरुध्द शौमिका महाडिकच ; भाजपची उद्या घोषणा

कोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाडिक आणि पाटील यांच्यात लढत होणार, हे आता निश्चित झाले आहे. कारण, या जागेसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा महादेवराव महाडीक यांच्या सूनबाई शौमिका (Shaumika Mahadik)महाडिक यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून जवळपास फिक्स झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करून त्याबाबतची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) हे उद्या (ता. १३ नोव्हेंबर) करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची शिरोलीत जाऊन चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. १२ नोव्हेंबर भेट घेतली. त्या भेटीतच शौमिका महाडीक यांच्या उमेदवारीला महाडिक कुटुंबीयांकडून हिरवा कंदिला मिळाला असून त्यांचे नाव अंतिम झाले आहे. या भेटीवेळी माजी खासदार धनंजय महाडीक, माजी आमदार अमल महाडीक उपस्थित होते.

कोल्हापूरचे पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतेज पाटील यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून निश्चित आहे. त्या दृष्टीने त्यांनी मागील काही दिवसांपासून डावपेचही आखायला सुरुवात केली आहे. पण, पाटील यांना भाजपकडून कोण टक्कर देणार? याविषयी राज्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. महाडिक यांच्या उमेदवारीमुळे सतेज पाटील यांना मात्र एकतर्फी वाटणारी निवडणूक रंगतदार झाली आहे. कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ११ नोव्हेंबर) एक बैठक झाली होती. त्यात बैठकीत काही नावांबाबत चर्चा झाली होती. त्यात माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रा. जयंत पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शौमिका महाडीक, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्याबाबत चर्चा झाली होती. जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे यांच्यासह महाडीक कुटुंबातील सदस्यही त्या बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा: भाजपचं ठरलं; कॉंग्रेसची घोषणा कधी? राजकीय पक्षांनी कसली कंबर

दरम्यान, आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे हेही प्रचंड उत्सुक आहेत. भाजपने आवडे यांना जर उमेदवारी दिली तर संपूर्ण ताकदीने विधान परिषदेची निवडणूक लढवण्याचा शब्द त्यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेला आहे. तसेच, भाजपकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याच्या मागे राहण्याची ग्वाही महाडीकांसह कोरे आणि आवाडे या आमदारांनी दिली आहे. त्यामुळे आवाडे की शौमिका महाडीक याविषयीची उत्सुकता उद्या (ता. १२ नोव्हेंबर) संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

माजी आमदार महादेवराव महाडीक यांची आज भेट घेऊन चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी आणि निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील हे सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या सांत्वनपर भेटीला गेले, तेथून ते मुंबईला जाणार आहेत. मुंबईत उमेदवारीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून नाव निश्‍चित करण्यात येणार आहे. पण, सद्यस्थितीत उमेदवारीसाठी शौमिका महाडीक यांचे नाव निश्‍चित झाल्यात जमा झाले आहे. त्यावर आता फक्त फडणवीस यांच्याकडून मोहोर उमटण्याचे बाकी आहे.

loading image
go to top