संकल्प करूया वसुंधरा रक्षणाचा!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

सर्व पर्यावरणप्रेमी नागरिकांना सस्नेह निसर्गस्नेही नमस्कार,
सज्जनहो, पत्रास कारण की, वर्तमानात संवादाची माध्यमे कोणती तर, एका सुरात सगळेच म्हणतील फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम वगैरे... आणि विषय काय तर कोरोना. गेल्या किमान दोन महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना या एकाच विषयाभोवती गुंतून पडले आहे. संपूर्ण विश्‍वाच्या प्रगतीला वेसण घालणाऱ्या विषाणूने जगभरात अनेकांचे बळी घेतले आहेत. हेच आहे वर्तमानाचे भीषण वास्तव. आणि यावर उपाययोजना, लस, औषधोपचार लवकरात लवकर मिळावे यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांची चालू असलेली धडपड.

'जागतिक पर्यावरण दिना'निमित्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा पत्रसंवाद...

सर्व पर्यावरणप्रेमी नागरिकांना सस्नेह निसर्गस्नेही नमस्कार,
सज्जनहो, पत्रास कारण की, वर्तमानात संवादाची माध्यमे कोणती तर, एका सुरात सगळेच म्हणतील फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम वगैरे... आणि विषय काय तर कोरोना. गेल्या किमान दोन महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना या एकाच विषयाभोवती गुंतून पडले आहे. संपूर्ण विश्‍वाच्या प्रगतीला वेसण घालणाऱ्या विषाणूने जगभरात अनेकांचे बळी घेतले आहेत. हेच आहे वर्तमानाचे भीषण वास्तव. आणि यावर उपाययोजना, लस, औषधोपचार लवकरात लवकर मिळावे यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांची चालू असलेली धडपड.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खरंतर सहा महिन्यांपूर्वी कुणी सांगितले असते की, जग एका महामारीला सामोरे जाणार आहे, ठप्प होणार आहे तर त्याच्यावर कोणीच विश्‍वास ठेवला नसता. पण आज हे भीषण वास्तव विश्‍वाच्या अर्थगतीला थोपवून ठेवत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या साऱ्या गंभीर प्रश्‍नामुळे आपला जगण्याचा एकूणच दृष्टिकोन बदलत चालला आहे. आपल्या सर्व वातावरण बदलाबाबत हे अनुभवत आहोत की अवेळी पडणारा पाऊस, बदलते ऋतुमान, कडाक्‍याची थंडी, कुठे गारपीट तर कुठे दुष्काळ, अचानक येणारी वादळे. पण यावर आपली सहज प्रतिक्रिया असते आजकाल हवामानाचा काहीच भरोसा नाही, काळ बदलत चालला आहे, उद्याचा काही भरोसा नाही. त्यामुळे आजचे आज उद्याचे उद्या पाहू. पण सज्जनहो, आपण याचा विचार करतो का की, या बदलत्या हवामानाला सामोरे जाण्यासाठी गेल्या काही दशकात आपण निसर्गाकडे, ऋतुचक्राकडे केलेले दुर्लक्ष हेच कारणीभूत आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्‍न पडत असतो याला मी जबाबदार कसा? पण जरा डोळसपणे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की दैनंदिन जीवनात प्लास्टिक पिशव्यांचा अमर्याद वापर, तिला कचऱ्यात टाकून दिल्यानंतर शेकडो वर्ष तिचे न होणारे विघटन, इतकेच काय प्लास्टिक पिशव्यांतून घरातील ओला कचरा बाहेर टाकून दिल्यानंतर गाई गुरांचा ती प्लास्टिक पिशवी खाल्याने होणारा मृत्यू, पाण्याचा अमर्याद वापर, नैसर्गिक संसाधनाचा गरजेपेक्षा अतिवापर, वृक्षतोड, घरातील कचरा विलगीकरण न करता तो तसाच बाहेर टाकून देणं. अशा काही मूलभूत गोष्टीमुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडत चाललं आहे.

वेतनासाठी घ्यावे लागणार नऊ हजार कोटींचे कर्ज;महाराष्ट्र सरकार लागोपाठ दुसऱ्या महिन्यात अडचणीत 

सज्जनहो, अजूनही वेळ गेलेली नाही, पण याचा अर्थ खूप वेळ हातात आहे, असेही नाही. आज विचार केला नाही तर उद्या विनाशाकडे वाटचाल थांबवता येणार नाही. कोरोनाच्या या संकटात आपल्या एक लक्षात आलं आहे की, मृत्यूच्या भयापोटी आपण एकमेकांपासून दूर राहून स्वतःला बंदिस्त करून घेतोय तर सभोवतालचा निसर्ग, पशुपक्षी, प्राणी, जलचर आज मुक्तपणे विहार करतायत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने बलवान समजला जाणारा माणूस आज हतबल झालाय. आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मी आपणास कळकळीची नम्र विनंती करतो की, येणाऱ्या प्रत्येक दिवशी आपण निसर्गाची काळजी घेऊ या. आपण सारेच जण या वसुंधरेचे सेवक आहोत, याचे भान ठेवू या. आता आपल्या लक्षात आले असेल की, माणसाने कितीही प्रगती केली तरी निसर्गाची शक्ती, ताकद अफाट आहे. आपल्या आयुष्यातील येणारा प्रत्येक क्षण आपण पर्यावरणस्नेही जगू या आणि वसुंधरेच्या रक्षणाचा संकल्प करू या.

हीच आहे वेळ विचार करण्याची,
कृतीची जोड देत निसर्गाचे रक्षण करण्याची.
एक निश्‍चय, एक संकल्प, खूप काही करू शकतो.
समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करू शकतो.

आपला स्नेहांकित 
आदित्य ठाकरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lets resolve to protect the planet