esakal | लॉकडाउन १५ जूनपर्यंत कायम; पण 'या' ठिकाणी होणार निर्बंध शिथिल
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

लॉकडाउन १५ जूनपर्यंत कायम; पण 'या' ठिकाणी होणार निर्बंध शिथिल

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : 'ब्रेक दि चेन'चे (break the chain) आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर (positivity rate) आणि तेथील ऑक्सिजन खाटांची (oxygen beds) उपलब्धता याचा विचार करण्यात येईल. त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. यासाठी २९ मे २०२१ रोजी आठवड्याच्या शेवटी असलेला पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता याचा विचार केला जाणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. (Lockdown lasts until June 15 But the restrictions on this place will be relaxed)

पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील

२०११ च्या जणगणनेनुसार 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.

पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेले जिल्हे आणि पालिकांसाठी नियमावली :

ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तसेच एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तिथे १२ मे २०२१ "ब्रेक दि चेन' आदेशाप्रमाणे निर्बंध शिथिल होतील.

१) सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.

२) आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र, आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील. अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई-कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.

३) दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.

४) कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.

५) कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते.

पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असलेले जिल्हे व पालिकांसाठी नियमावली :

ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे १२ मे २०२१ "ब्रेक दि चेन' आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.

१) अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत-बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.

२) या प्रशासकीय घटकांमध्ये न येणारी इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे "ब्रेक दि चेन'चे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.

३) दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

loading image
go to top