बार्शी, मोहोळ, अक्कलकोटसह या गावांमध्ये लॉकडाऊन कायम 

प्रमोद बोडके
Sunday, 26 July 2020

सोलापूर शहरात यापुढे संचारबंदी लागू केली जाणार नाही सोलापूर शहर व परिसरात केलेल्या लॉकडाऊनचे रिझल्ट येत्या सात ते आठ दिवसात दिसतील. लॉकडाऊनच्या कालावधीत शहर आणि जिल्ह्यात सुमारे वीस हजार रॅपिड अँटिजन टेस्ट झाल्या. त्यामध्ये 1584 कोरोना बाधित आढळले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये दररोज दोन हजार टेस्ट घेतल्या जाणार आहेत. सोलापुरातील गंभीर रुग्णांवर नामवंत बाहेर गावांमधील डॉक्‍टरांकडून उपचार करता यावे यासाठी टेलि-आयसीयु प्रणाली सुरु झाली आहे. यामुळे सोलापूर मधील गंभीर रुग्णांवर उपचारासाठी मुंबई, पुणे येथील डॉक्‍टरांचा सल्ला घेऊ शकतो. त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या हायस्पीड डाटा लाईनची व्यवस्था केली आहे. 
- दत्तात्रय भरणे, पालकमंत्री, सोलापूर 

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेला लॉकडाऊन आज (रविवारी) पूर्ण होत आहे. सोलापूर शहराचा भाग वाढीव लॉकडाऊनमधून वगळण्यात आला आहे. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे त्या ठिकाणचा लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. त्यानुसार सुधारित लॉकडाऊनचा आदेश आज जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतला आहे. 

नवीन आदेशानूसार आता बार्शी शहर वैराग या भागातील लॉकडाऊन 31 जुलै पर्यंत वाढविला असून या कालावधीत जिवनावश्‍यक वस्तूसाठी सवलत दिलेली नाही. अक्कलकोट शहरासाठी 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन असून फक्त 28 जुलै रोजीच सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेतर जीवनावश्‍यक वस्तू (उदा. किराणा दुकान, दूध, भाजीपाला) सुरु राहणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बोरामणी कासेगाव परिसरात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन असून या भागाला कोणतीही सवलत नाही. कुंभारी, विडी घरकुल, वळसंग, मुळेगाव, मुळेगाव तांडा, होटगी, लिंबी चिंचोळी, बक्षी हिप्परगा, उळेगाव, तांदुळवाडी या भागात 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन असणार असून या भागासाठी 27 व 28 जुलै रोजी जिवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत चालू राहणार आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील नान्नज, कोंडी व तिऱ्हे या गावांसाठी 31 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊनन असून त्यांना कोणतीही सवलत नाही. मार्डी, पाकणी, बाणेगाव, तळे हिप्परगा, हगलूर, एकरुख, कारंबा, भोगाव या भागासाठी 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन असून 27 व 28 जुलै रोजी जीवनाश्‍यक वस्तू खरेदीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतची सवलत देण्यात आली आहे. मोहोळ शहर, कामती खुर्द, कामती बुद्रुकचा लॉक डाऊन 31 जुलैपर्यंत असून 27 व 28 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी 7 पर्यंत जीवनावश्‍यक वस्तूसाठी सवलत देण्यात आली आहे. मोहोळ तालुक्‍यातील कुरूल मध्येही 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन असून या गावाकरिता कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown continues in these villages including Barshi, Mohol, Akkalkot