Thane Loksabha : ठाण्याचा नकाशा घेऊन आनंद दिघे भर दुपारी 'मातोश्री'वर पोहोचले अन्...; भाजपचा मतदारसंघ शिवसेनेला कसा मिळाला?

आता तब्बल २८ वर्षांनंतर नियतीने हाच डाव पुन्हा फिरवला आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असला, तरी या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. जिल्ह्यात नगरसेवकांपासून ते ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत भाजपचे कमळ फुलले आहे. याच जोरावर मुख्यमंत्री ठाण्याचे असले, तरी भाजपने ठाणे पुन्हा काबीज करण्याचा निश्चय केला आहे.
Thane Loksabha election 2024
Thane Loksabha election 2024esakal

भाजपच्या ताब्यात असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ १९९६ मध्ये शिवसेनेने हिसकावला. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ही खेळी यशस्वी करून दाखवली. एका भाषणाचे निमित्त याला ठरले असले, तरी ही मोहीम सहज शक्य नव्हती; पण आनंद दिघे यांनी जे डाव टाकले, ज्या नकाशाच्या जोरावर त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ मागितला. आज तोच डाव भाजप खेळत आहे.

सेंट्रल मैदानावर तत्कालीन खासदार राम कापसे यांनी कल्याण सिंग यांना हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी दिल्यानंतर आनंद दिघे भडकले व त्यांनी यापुढे भाजपला जिल्ह्यात हातपाय पसरू न देण्याची जणू शपथच घेतली. ही संधी त्यांना १९९६ सालच्या लोकसभा निवडणुकीत मिळाली. ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच हवा, या हट्टावर ते ठाम होते; पण त्यांनी आंधळेपणाने हे स्वप्न पाहिले नव्हते. यासाठी त्याचा दांडगा अभ्यासही केला. त्या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या काही पत्रकार मित्रांची त्यांनी मदत घेतली. ज्याप्रमाणे इंग्रज नकाशावर रंगछटा टाकून किती राज्य ताब्यात आली, कुठे कोणाचे साम्राज्य आहे, आदी बाबींचा भूगोल, इतिहास व वर्तमान तपासत त्याच पद्धतीने दिघे यांनी ठाण्याचा नकाशा समोर ठेवला.

त्या वेळी पालघर, कल्याण, भिवंडी हे मतदारसंघही ठाण्यात होते. पत्रकार मित्र, काही साथीदार आणि आनंद दिघे यांनी स्केच पेन हातात घेत कुठे कोणाच्या किती जागा आहेत, याची चाचपणी करण्यास सुरुवात केली. खासदार भाजप, आमदार भाजपचे किती, शिवसेनेचे किती, जिल्हा परिषदेत किती सदस्य, ग्रामपंचायतीत किती सदस्य... असे करत जिथे शिवसेना तिथे ते भगव्या रंगाने अधिकचे चिन्ह जोडत गेले. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, जव्हार, डहाणूपर्यंत... बघताबघता ठाणे जिल्ह्याचा अख्खा नकाशा भगव्या रंगाने भरला. मग खासदार भाजपचा का नको, याचे उत्तर त्यांना सापडले. पूर्वापार जागा कोण ठरवतो, राजकारण बदलण्यासाठीच असते ना... हाच नकाशा घेऊन ते मातोश्रीवर दुपारी दोन वाजता गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जागावाटपाची चर्चा करण्यासाठी प्रमोद महाजनही हजर होते. बाळासाहेबांनी त्यांच्या शैलीत हा नकाशा महाजन यांना दाखवत अक्षरशः बोलती बंद केली. ठाणे लोकसभेसाठी आनंद दिघे यांनी टाकलेला हा डाव यशस्वी ठरला आणि ठाणे शिवसेनेचे झाले.

पण आता तब्बल २८ वर्षांनंतर नियतीने हाच डाव पुन्हा फिरवला आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असला, तरी या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. जिल्ह्यात नगरसेवकांपासून ते ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत भाजपचे कमळ फुलले आहे. याच जोरावर मुख्यमंत्री ठाण्याचे असले, तरी भाजपने ठाणे पुन्हा काबीज करण्याचा निश्चय केला आहे.

दिघेंच्या उमेदवारीची पहिली पुडी सुटली

शिवसेना-भाजप युतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अखेर ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याचे निश्चित झाले; पण ऐनवेळी वातावरणा तयार करायचे कसे, राजकीय गणिते मांडायची कशी, हा प्रमुख प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. त्यातूनच आनंद दिघे यांच्या नावाची हळूच पुडी सोडण्यात आली.

आनंद दिघे यांनी दाखवलेल्या ठाणे जिल्ह्याच्या नकाशात ८० टक्के जागा ही शिवसेनेच्या भगव्याने रंगली होती. या रंगावर भाजपचे वरिष्ठ नेते प्रमोद महाजन यांचीही बोलती बंद झाली; पण सहजासहजी जागा बदलायची असेल, तर राजकारण तर करावेच लागेल. मग त्यांच्याच डोक्यातून सुपीक कल्पना बाहेर पडली. आनंद दिघे यांना त्यावेळी त्यांच्या कार्यातून ‘देवत्व’ प्राप्त झालेच होते; मग त्याचाच फायदा घेऊन स्वतः आनंद दिघे यांनाच ठाणे लोकसभा लढायची आहे, अशी पुडी सोडण्याचे ठरले. स्क्रीप्टनुसार आनंद दिघे यांचे ‘हो, बाळासाहेब म्हणाले तर निवडणूक लढवणार’ हे उत्तरही तयार झाले.

Thane Loksabha election 2024
''वेश्यागृहातील ग्राहकाला अटक करता येणार नाही!'' उच्च न्यायालयाचा निर्वाळा, नेमकं प्रकरण काय होतं?

खरे तर आनंद दिघे यांना कधीच निवडणूक लढायची नव्हती. त्यांनी ठाण्याची सत्ता चालवली; पण कोणतेही संविधानिक पद न घेता. केवळ जिल्हाप्रमुख ही उपाधीच त्यांच्यासाठी सर्वस्व होते; पण त्या वेळी नाही म्हणायचे नाही, हो म्हणायचे म्हणजे भाजप नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा रोष कमी होईल, असे ठरले; मग काय ठरल्याप्रमाणे आनंद दिघेंना ठाणे लोकसभा निवडणूक लढवायची आहे, असे म्हटल्यावर ही जागा विनाअडथळा शिवसेनेच्या ताब्यात आली.

संघ परिवारातले रामभाऊ कापसे यांचे तिकीट कापणे सोपे नव्हते; पण आनंद दिघे यांनी ते उभ्याउभ्या कापले. विद्यमान खासदारांना घरी बसवण्याची पद्धत त्याकाळी फक्त काँग्रेसकडे होती; पण महाराष्ट्रात याचा पहिला पायंडा आनंद दिघेंमुळे पडला, असे म्हणण्यास हरकत नाही.

आता करपलेली भाकरी जशी परतावी, तसा नियतीने सूड उगवला आहे. आजच्या घडीला शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे गटाची भाजपसोबत युती झाली आहे. स्वतः मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत; पण ठाणे लोकसभेसाठी त्यांना आता संघर्ष करावा लागत आहे. दिघेंनी मिळवलेल्या ठाणे मतदारसंघ त्यांच्यासाठी भावनिक आणि प्रतिष्ठेचा बनला आहे; पण ओवळा- माजिवाडा आणि कोपरी-पाचपाखाडी सोडले, तर शिवसेनेची ताकद कुठेच नाही. दुसरीकडे शिंदे गटाच्या ७ खासदारांचा पत्ता याच पद्धतीने म्हणजे ‘सर्व्हे’च्या नावाने कापून भाजपने त्यांना घरी बसवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com