माळरानाचे नंदनवन करतोय "लोकनेते नांगर', खडकाळ जमिनीसाठी विष्णू थिटे यांनी बनविली 16 औजारे 

प्रमोद बोडके
Monday, 21 September 2020

मी देखील शेतकरीपुत्र असल्याने शेतकऱ्यांचे दु:ख आणि वेदना मला माहिती आहेत. शेतकऱ्यांमध्ये सोनं पिकविण्याची ताकद आहे. शेतकऱ्यांना निसर्गाने आणि बाजारपेठेने फक्त साथ दिली पाहिजे. शेतकऱ्यांना कमीत कमी दरात चांगली अवजारे उपलब्ध व्हावीत, यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. शेतीसाठी येणाऱ्या अडचणींवर यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून माफक दरात चांगला पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
- विष्णू थिटे, प्रमुख, लोकनेते इंजिनिअरिंग वर्क्‍स 

सोलापूर : सोलापूरसह शेजारच्या मराठ्यावाड्यातील जिल्हे म्हणजे लाव्हारसापासून तयार झालेल्या बेसॉल्ट खडकाचा प्रदेश. जमिन माळरान अन्‌ खडकाळ असल्याने बैलांचीही ताकद इथे निरर्थक ठरत होती. माळरानाला फोडून त्याचे नंदनवनात रुपांतर करण्यासाठी लोकनेते नांगर आज उपयुक्त ठरत आहे. मोहोळ तालुक्‍यातील नालबंदवाडी येथील विष्णू थिटे या युवकाने तयार केलेले नांगर शेतकऱ्यांचे शिवारं फलवू लागले आहेत. 

खडकाळ अन्‌ माळाच्या जमिनी नागरण्यासाठी पूर्वी चार-चार बैलांची गरज पडत होती. बदलत्या काळात बैलांवरची शेती खर्चिक झाली अन्‌ बैलाची जागा ट्रॅक्‍टरने घेतली. ट्रॅक्‍टर आला पण त्यासाठी लागणारी अवजारे, खडकाळ जमिनी नागंरणारे नांगर या भागात तयार होत नसल्याने त्यांना पुणे, कोल्हापूर येथील नागंरांवर अवलंबून रहावे लागत होते. कोल्हापूर परिसरातील जमिनी काळ्याभोर आणि भुसभुसित असल्याने तेथील नागर या भागात चालत नाहीत. आपल्या भागासाठी हवे असलेले नांगर असावेत, म्हणून विष्णू थिटे व त्यांचे बंधू ब्रह्मदेव, महेश यांनी अनगर (ता. मोहोळ) येथे लोकनेते इंजिनिअरिंग वर्क्‍सची सुरुवात केली. 

ट्रॅक्‍टरला लागणारे डबल पल्टी नांगर (35,45,50 आणि 55 एचपी), 25 एचपीचा डबल पल्टी नांगर, 25 एचपीचा फास सरी पेरणी, दोन फळीचे सरी यंत्र, नऊ व सात दातांचा पल्टी फास, नऊ व सात दातांचा फन यासह ट्रॅक्‍टरच्या विविध अवजारांची निर्मिती त्यांनी केली आहे. आयटीआय झाल्यानंतर कोल्हापूर व पुण्यातील वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या विष्णू थिटे यांनी नोकरीचा मार्ग सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. अवघ्या दहा ते पंधरा वर्षात त्यांनी गगनभरारी घेतली आहे. अनगर व मोहोळमधील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांचे वर्कशॉप आहेत. सोलापूर-पुणे महामार्गावर वडवळच्या हद्दीत त्यांनी महाराष्ट्र ऍग्रो एजन्सीच्या माध्यमातून शेती अवजारांचे भव्य शोरुम साकारले आहे. 
 
महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यात लोकनेते नांगर 
मोहोळ तालुक्‍यातील नालबंदवाडी सारख्या लहान गावातून थिटे यांचा अवजार निर्मितीचा सुरू झालेला प्रवास आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. खडकाळ, मुरुमाच्या जमिनीसाठी आवश्‍यक असलेली ट्रॅक्‍टर अवजारे आज महाराष्ट्राच्या जवळपास 16 जिल्ह्यात पोहोचली आहे. विविध ठिकाणी त्यांचे डिलर आहेत. वर्कशॉपमधील कामगारापासून सुरू झालेला विष्णू थिटे यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक म्हणून झाला आहे. जवळपास साडेसहा कोटी रुपयांची उलाढाल आणि साठ जणांना रोजगार देणारा उद्योग त्यांनी उभा केला आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी केलेल्या बहुमोल सहकार्यामुळे हा प्रवास शक्‍य झाल्याचेही थिटे यांनी सांगितले. 

ऊस उत्पादकांसाठी खोडवा कटर 
देशात सर्वाधिक साखर कारखाने म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात उसाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. ऊस गेल्यानंतर खोडवा काढण्यासाठी आणि सरी मोडण्यासाठी शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता. रोटरच्या माध्यमातून ही कामे होत नसल्याने थिटे यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांची हीच अडचण ओळखून विष्णू थिटे यांनी खोडवा कटर तयार केले आहे. सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते त्या जिल्ह्यात खोडवा कटर पोहोचविण्यात येणार असल्याची माहितीही थिटे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Loknete Nangar" is a paradise of rocky ground, 16 tools made by Vishnu Thitte